रावसाहेब कसबेंना बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार
By admin | Updated: October 21, 2016 00:17 IST
()
रावसाहेब कसबेंना बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार
()नागपूर : मारवाडी फाऊंडेशन नागपूरतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष डॉ गिरीश गांधी उपस्थित होते.मारवाडी फाऊंडेशनसारख्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर काम करणाऱ्या आणि खंबीर भूमिका घेऊन कार्यशील राहणाऱ्या संस्थेकडून पुरस्कार मिळाला याचा आनंद असल्याचे मत रावसाहेब कसबे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. महात्मा गांधींचे नाव चुकीच्या पद्धतीने समोर आणल्या जात असून त्यांच्या कार्याची विस्मृती होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, सामान्यांमध्ये वैचारिक गोंधळ सुरू असून लोकहित कशात आहे याचे सरकारला भान नाही. त्यामुळे समाजातील सध्याचा वाढता वैचारिक दहशतवाद मोडून काढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले, डॉ. आंबेडकर काय आहेत हे देशाला जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत देशाचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. डॉ. गिरीश गांधी यांनी समाजातील उपेक्षित घटकांना शक्ती प्रदान करण्याचे कार्य मारवाडी फाऊंडेशनतर्फे करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. आभार सुधीर बाहेती यांनी मानले. (प्रतिनिधी)