मध्य प्रदेशातील मांडला जिल्हा रुग्णालयाच्या लहान मुलांच्या वॉर्डमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये रुग्णांच्या बेडजवळ ठेवलेल्या टेबलवर मोठ्या संख्येने उंदीर दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा उघडकीस आला, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे.
उंदरांचा सुळसुळाट असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रुग्णालयाच्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये बेडच्या शेजारी ठेवलेल्या टेबलवर उंदीर फिरताना दिसत आहेत. हे दृश्य अत्यंत भयानक आणि चिंताजनक आहे, कारण हा वॉर्ड नवजात आणि लहान मुलांच्या उपचारांसाठी आहे. येथे स्वच्छता आणि संसर्गमुक्त वातावरण खूप महत्वाचं आहे. व्हिडिओ समोर येताच सर्वसामान्य जनता, रुग्णांचे नातेवाईक आणि स्थानिक नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली.
व्हायरल व्हिडीओ समोर आल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली आहे. मांडला जिल्हा रुग्णालयाचे आरएमओ डॉ. प्रवीण उईके म्हणाले की, त्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे आणि ते ते गांभीर्याने याकडे पाहत आहेत. आमच्या रुग्णालयात वेळोवेळी पेस्ट कंट्रोल केलं जातं. परंतु जर इतके उंदीर दिसले तर ती समस्या अजूनही अस्तित्वात असल्याचं दिसत आहे. रुग्णालय प्रशासन लवकरच या समस्येचे निराकरण करण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करेल आणि पेस्ट कंट्रोल प्रक्रिया अधिक प्रभावी केली जाईल.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, मांडला जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयाची पाहणी केली आणि लहान मुलांच्या वॉर्डच्या स्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालय प्रशासनाला फटकारलं आणि रुग्णांच्या, विशेषतः बालकांच्या सुरक्षिततेशी आणि आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही असं म्हटलं. तसेच त्यांनी व्यवस्थापनाला रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था लवकरात लवकर सुधारण्याचे आणि नियमितपणे पेस्ट कंट्रोल करण्याचे निर्देश दिले.