नवी दिल्ली : महाराष्ट्रात फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंबंधी आदेश जारी करण्यात आले आहे.
रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. आता यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांची नियुक्ती सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालपदी करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांचा सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक पदाचा कार्यकाळ 30 जून 2024 पर्यंत असणार असल्याचे केंद्र सरकारच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. रश्मी शुक्ला 1988 च्या बॅचच्या आयपीएस आधिकारी आहेत.
महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडली होती. भाजप-शिवसेना युतीच्या काळात राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांची चौकशी सुरु झाली होती. मात्र, शिंदे सरकार आल्यावर त्यांच्यावरील आरोप मागे घेण्यात आले होते.
दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केले होते. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, खासदार संजय काकडे, एकनाथ खडसे यांचा समावेश होता. हे प्रकरण राज्यात गाजले होते.