रामनाथ कोविंद यांचा विजय सहज शक्य!
By admin | Published: June 21, 2017 03:27 AM2017-06-21T03:27:41+5:302017-06-21T03:27:41+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण दिसत आहे.
हरिष गुप्ता/शीलेश शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना निवडून येण्यात अडचणी दिसत नसतानाच, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण दिसत आहे. या दोन्ही नेत्यांनी दलित उमेदवार असलेल्या कोविंद यांच्याविषयी अनुकूल मत व्यक्त केल्यामुळे, विरोधी मतांमध्ये फूट पडण्याची शंका काँग्रेसला वाटत आहे.
भाजपाच्या गोटात मात्र, विजयाची खात्री आहे. रालोआतील शिवसेनेसह सर्व घटक पक्ष कोविंद यांना मतदान करतील, हे निश्चित झाले आहे. केंद्रात सत्तेत नसलेले, पण राज्यांत भाजपासमवेत असलेले पक्षही कोविंद यांनाच मते देतील, असा दावा आहे. त्यातच वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रीय समिती ही दक्षिणेकडील पक्ष व बिजू जनता दल या पक्षांचा पाठिंबा लक्षात घेता कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अण्णा द्रमुकही त्याच वाटेने जाऊ शकेल. राजद, जनता दल (यू), लोक दल, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्या भूमिका स्पष्ट नसल्या, तरी यापैकी काही पक्ष कोविंद यांनाच मते देतील, अशी भाजपा नेत्यांना खात्री आहे.
राष्ट्रपतिपदी निवडून येण्यास ५ लाख ४९ हजार ४४२ इतक्या मूल्याची मते मिळणे आवश्यक असून, शिवसेना वगळता भाजपाकडे ५ लाख ६ हजार ८३४ किमतीची मते आहेत. शिवसेनेच्या मतांची संख्या २५ हजारांहून अधिक असून, तीही कोविंद यांनाच पडणार आहेत. या वेळी दक्षिणेकडील चार मोठे पक्ष भाजपासमवेत जातील, असे दिसत आहे. त्यामुळे साडेपाच लाख किमतीची मते मिळवणे कोविंद यांना सहज शक्य मानले जात आहे.
दुसरीकडे विरोधात असलेल्या नितीशकुमार व मायावती यांची भूमिका काँग्रेसला अडचणीची वाटत आहे. दोन नेत्यांच्या भूमिकेनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी पक्षाच्या नेत्यांशी विचारविनिमय केला. त्यानंतर, नितीशकुमार यांना भेटण्यासाठी गुलाम नबी आझाद बिहारकडे रवाना झाले. मायावती यांच्याशीही काँग्रेस नेते चर्चा करतील, असे दिसते. त्याचबरोबर, डावे व अन्य विरोधी पक्ष यांच्याशीही काँग्रेसतर्फे संपर्क सुरू आहे.
भाजपाने दलित उमेदवार दिला असताना विरोधकांमध्ये फूट असल्याचे दिसू नये, यासाठी काँग्रेसतर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहे. दलित उमेदवारालाविरोध करणे नितीशकुमार व मायावती यांना अवघड जाणार आहे. त्यामुळे आपणही दलित उमेदवार द्यावा का, याबाबत काँग्रेस नेते आपापसात व अन्य पक्षांशी चर्चा करीत आहेत. त्यात मीरा कुमार व सुशीलकुमार शिंदे यांची नावे पुढे आली आहेत. देशातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एम. एस. स्वामीनाथन यांचे नावही अचानक चर्चेत आले आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही याआधी स्वामीनाथन यांचे नाव पुढे केले होते, हे विशेष.
सर्व विरोधी नेत्यांची बैठक २२ जूनला होणार आहे. त्याआधी वा त्यावेळी उमेदवाराच्या नावावर एकमत व्हावे, असा प्रयत्न सुरू आहे. डाव्या पक्षांनी गोपाळकृष्ण गांधी यांचे नाव सुचविले आहे. ते राज्यपाल होते. अर्थात या निवडणुकीत विजय होतो की पराभव हे महत्त्वाचे नसून, ही दोन विचारप्रणालींमधील लढाई आहे, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी घोषित झाल्यानंतर, रामनाथ कोविंद यांनी सोमवारी बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राजीनामा मंजूर केला असून, प. बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. गरज भासल्यास १७ जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी पूर्ण होत आहे.