भोपाळ : टीव्हीवर १९८६-८७ मध्ये लोकप्रिय झालेल्या रामायण या गाजलेल्या मालिकेत सीतेची भूमिका बजावणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी १९९१ साली भाजपातर्फे लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदारही झाल्या. आता मालिकेत रामाची भूमिका बजावलेले अरुण गोविल काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवण्याची चिन्हे आहेत.लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याविरोधात इंदूर मतदारसंघातून गोविल यांना उतरवण्याचा काँग्रेस विचार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी तसे प्रयत्न सुरू केल्याचे समजते. इंदूरमधून महाजन १९८९ पासून सलग आठ वेळा निवडून गेल्या आहेत. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला सत्ता मिळाल्याने लोकसभेच्या जागा वाढवण्यासाठी कमलनाथ यांनी सुरू केली आहे.इंदूर हा भाजपाचा बालेकिल्लाच आहे. त्यामुळे तिथे तगडा उमेदवार असावा, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तिथे प्रभू रामचंद्राला उभे केल्यास त्याचा नक्की मिळेल, असे काँग्रेसचे गणित आहे. त्यांच्या नावावर गंभीरपणे विचार सुरू आहे, असे मध्यप्रदेश काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रमुख नरेंद्र सलुजा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
सुमित्रा महाजन यांच्याविरोधात ‘रामायण’मधील प्रभू रामचंद्र? इंदूरमध्ये अरुण गोविल यांच्या नावाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 05:02 IST