लखनौ : अयोध्येत भव्य राम मंदिर निर्मितीसाठी हिंदू बांधवांना संघटित करण्याच्या दृष्टिकोनातून विश्व हिंदू परिषदेतर्फे दुर्गा पूजेच्या धर्तीवर देशभरात राम महोत्सव साजरा करण्याची योजना आखली जात आहे. आम्ही येत्या २१ किंवा २२ मार्चला राम महोत्सवास प्रारंभ करणार असून १ एप्रिलपर्यंत हा उत्सव साजरा केला जाईल. संघटनेच्या वतीने प्रथमच अशा प्रकारचे आयोजन केले जात आहे,असे विश्व हिंदू परिषदेचे माध्यमप्रमुख शरद शर्मा यांनी गुरुवारी येथे सांगितले. देशातील प्रत्येक खेड्यात हा कार्यक्रम होणार असून जेथे मंदिर नसेल तेथेसुद्धा याची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महोत्सवादरम्यान श्रीरामाच्या दोन ते अडीच फूट उंच मूर्तीची नवरात्रीप्रमाणे दहा दिवस पूजा केली जाईल. नंतर या मूर्तीची कायम प्रतिष्ठापना अथवा विसर्जन केले जाईल. या महोत्सवाने रामजन्मभूमी आंदोलनाला बळकटी मिळेल,असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला. तब्बल दीड ते दोन लाख गावांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याची विहिंपची योजना आहे. प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रत्येक गावाचा यात समावेश केला जाणार आहे. (वृत्तसंस्था)
मंदिर उभारण्यासाठी आता ‘राम महोत्सव’
By admin | Updated: January 30, 2015 05:56 IST