नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या वर्तणुकीमुळे नाराज व पंतप्रधानांच्या कार्यशैलीवरून दु:खी झालेल्यांची नाराजी संघ या आठवड्यात दूर करणार आहे. राजनाथ सिंह, मनोहर पर्रीकर व नितीन गडकरी यांच्याशी संघाच्या शीर्षस्थ पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर आता पंतप्रधानांशी बोलून तोडगा काढला जाणार आहे. शहा यांनी संघाकडे मांडलेली बाजू संघाच्या पचनी पडली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सरकारला २६ मे रोजी एक वर्षे होत असताना सरकारच्या मंत्र्यांमध्ये सुरू असलेली धुसफुस संघाने गंभीरपणे घेतली आहे. सिंह यांच्या राजीमान्याच्या शक्यतेच्या बातमीनंतर त्यांच्यासह भाजपा, संघानेही दिवसभर चुप्पी साधली. अमित शहा यांनी दिल्लीबाहेर बैठकी घेतल्या. या चुप्पीचा अर्थ गुलदस्त्यात आहे. मोदी यांच्या आगमनानंतर राजधानीतील झंडेवाला येथील संघ कार्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत २०, २१ किंवा २३ मे रोजी ही बैठक होईल. काहींनी २० तारखेलाच ही बैठक होत असल्याचे सांगून अजून वेळ निश्चित झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पंतप्रधानांना शक्य असेल त्या वेळी चर्चा करू, असा निरोप संघाने त्यांना धाडल्याचे सांगण्यात आले. मंत्र्यांचा अपमान केला जातो, त्यांना टार्गेट केले जाते, पंतप्रधानांना फोकस करण्याचा आग्रह धरला जातो, हे विषय प्रामुख्याने चर्चेला आल्याने संघ सतर्क झाला आहे. एका सूत्राने सांगितले की यावेळी दोन मंत्री व पक्षाध्यक्षांना नागपूरला बोलवून संघाने सरकारवर आमचे लक्ष आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे़ एरवी दिल्लीत या नेत्यांच्या बैठकी झाल्या असत्या तर त्याला फारसे महत्त्वही मिळाले नसते. (विशेष प्रतिनिधी)
राजनाथ सिंह यांच्या नाराजीने सत्तेत अस्वस्थता
By admin | Updated: May 19, 2015 02:14 IST