नवी दिल्ली : कुख्यात डॉन छोटा राजन याची येथील एका न्यायालयाने पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्याला शुक्रवारी पहाटेच इंडोनेशियाच्या बाली बेटावरून भारतात आणण्यात आले होते.छोटा राजन गेल्या २७ वर्षांपासून फरार होता. सुरक्षेच्या कारणास्तव सीबीआयच्या मुख्यालयातच छोटा राजनची सीबीआय कोठडीत रवानगी करण्याची प्रक्रिया न्यायालयाने पूर्ण केली. एकेकाळी तो दाऊदचा विश्वासू साथीदार होता. इंडोनेशियाहून आणल्यानंतर त्याला सरळ सीबीआय मुख्यालयात नेण्यात आले आणि त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. २५ आॅक्टोबर रोजी त्याला अटक करण्यात आली होती. इंडोनेशियात काही दिवसांपूर्वीच ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने तेथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान उड्डाणे रद्द झाल्याने त्याचे भारतातील आगमन लांबले. येथे आणल्यानंतर त्याची सीबीआयमधील इंटरपोल विभागाने खबरदारीची कोठडी घेतली होती. तो वैद्यकीयदृष्ट्या फिट असून, त्याला डायलिसिसची गरज नाही, असे सीबीआय प्रवक्त्याने कालच स्पष्ट केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
छोटा राजनला पाच दिवसांची कोठडी
By admin | Updated: November 8, 2015 02:03 IST