नवी दिल्ली : माझ्या हाती सत्ता दिली तर राज्यात उपलब्ध होणारी प्रत्येक नोकरी फक्त महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींनाच दिली जाईल. एवढेच नव्हे तर परराज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांना रेल्वे स्थानकांवरच अडवून परत पाठविले जाईल, असे भाषण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केल्याबद्दल निवडणूक आयोगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली आहे.राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकास देशात कुठेही जाण्याचा, स्थायिक होण्याचा व नोकरीधंदा करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे असे धोरण राबविण्याच्या आश्वासनांवर निवडणुकीत मते मागणे हा केवळ आचारसंहितेचाच भंग नाही तर ती मुलभूत हक्कांचीही पायमल्ली आहे, असा समज आयोगाने दिला.घाटकोपर आणि कालिना येथे अनुक्रमे ५ आणि ७ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या प्रचारसभांमध्ये राज ठाकरे यांनी अशा प्रकारची विधाने केली होती. त्यावरून विनोद तिवारी यांनी तक्रार केल्यानंतर आयोगाने ठाकरे यांना नोटीस काढली होती. त्यावर राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराचा विचार करून आयोगाने त्यांचे कान उपटले.मराठी माणसाचे हित जपणे हा माझ्या पक्षाचा मुख्य अॅजेंडा आहे. त्यामुळे त्यानुसार धोरणे आखणे व सत्तेत आल्यास ती राबविण्याची ग्वाही देण्याने मुळात कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होत नाही व राजकीय पक्षाने ध्येयधोरणांच्या प्रचारात आचारसंहितेचा भंग होत नाही, अशी भूमिका राज यांनी उत्तरात घेतली, परंतु ती अमान्य करून निवडणुकीत पक्षीय राजकारण करतानाही राज्यघटनेचे भान ठेवायला हवे, याची जाणीव राज ठाकरे यांना करून दिली.आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल आयोग तुमची तीव्र निंदा करीत आहे व भविष्याच जाहीर वक्तव्ये करताना सांभाळून बोलावे, अशी तुम्हाला समज देत आहे, असे आयोगाने दिलेल्या निकालत नमूद केले गेले आहे. (विशेष प्रतिनिधी)
राज ठाकरेंची आयोगाकडून कानउघाडणी
By admin | Updated: October 21, 2014 03:08 IST