Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी भाषेवरुन चांगलाच वाद निर्माण झालाय. याच वादाच्या पार्श्वभूमीवर मीरा रोड येथे मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एका व्यापाऱ्याला मनसैनिकांना मारहाण केली होती. त्यानंतर देशभरातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसैनिकांवर टीका करण्यात आली होती. तिथल्या व्यापाऱ्यांनीही बंद पुकारुन आव्हान दिलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी मीरा रोड येथे सभा घेऊन मराठीला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला. यावेळी भाषणादरम्यान, राज ठाकरेंनी सरदार वल्लभभाई पटेलांचा उल्लेख करत टीका केली. यावरुन आता गुजरातमधील राजकारण्यांनी टीका केली आहे.
मीरा रोड येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता असं म्हटलं. राज ठाकरे यांच्या विधानावर पाटीदार नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी सरदार पटेलांचा अपमान केल्याचे म्हणत पाटीदार नेते अल्पेश कथिरिया यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी याप्रकरणी माफी मागावी अशी अल्पशे कथिरिया यांनी केली.
राज ठाकरे भांडणे लावायचं काम करत आहेत
"राज ठाकरे हे गुजराती लोकांबद्दल आणि सरदार पटेल यांच्याविरुद्ध जाहीरपणे बोलले आहे. आता राज ठाकरे यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. राज ठाकरे गुजराती आणि मराठी लोकांमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत मनसे अस्तित्वात नव्हती, आता ते उभे राहण्याचा प्रयत्न करताना सरदार पटेलांचा अपमान करत आहेत. भाषेवरून आधी त्यांनी गुजराती लोकांना आणि आता मान्यवरांना लक्ष्य केले. हा केवळ गुजरातचा नाही तर संपूर्ण भारताचा अपमान आहे. सरदार साहेब आणि मोरारजी देसाई यांना लक्ष्य करणे म्हणजे तणाव पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. असे राजकीय स्टंट आम्ही सहन करणार नाही," असं अल्पेश कथिरिया म्हणाले.
राज ठाकरेंनी गुजरातमध्ये पाय ठेवून दाखवावा
पाटीदार समुदायाच्या संघटनेचे प्रमुख लालजी पटेल यांनीही राज ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच राज ठाकरे यांनी गुजरातमध्ये पाऊल ठेवल्यास त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला. "तुम्ही अखंड भारताच्या शिल्पकाराचा अपमान करता आणि राजकीय स्वीकृतीची अपेक्षा करता? गुजरातमध्ये या, आम्ही तुमचा पूर्ण ताकदीने विरोध करू," असे लालजी पटेल म्हणाले.
काय म्हणाले राज ठाकरे?
"राज्यात हिंदी भाषा सक्ती करण्याच्या मागे लागलेले आहेत. केंद्र सरकार पूर्वीपासून अशा प्रकारचा दबाव आणतंय. काँग्रेसचं सरकार असल्यापासूनचं हे सर्व सुरु आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, त्यासाठीचा जो लढा होता तो मोठा लढा होता. मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव काही गुजराती व्यापाऱ्यांचा आणि गुजराती नेत्यांचा होता. मी एकदा आचार्य अत्रेंचं पुस्तक वाचत होतो तेव्हा मला धक्का बसला. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडून बोललं गेलं? सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्वप्रथम सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका. मोरारजी देसाई यांनी मराठी माणसावर गोळीबार केला होता. ज्यांना आम्ही लोहपुरुष म्हणून मानत आलो त्यांनी असं सांगितलं. आम्ही त्यांच्याकडे आदराने पाहत आलोय. पण त्यांनी महाराष्ट्राला विरोध केला," असं राज ठाकरे म्हणाले.