नवी दिल्ली: देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधक सातत्याने केंद्र सरकारला लक्ष्य करत असताना प्रत्यक्षातही रोजगार क्षेत्रातील परिस्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारकडून रेल्वे खात्यातील २ लाखाहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर या नोकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी तरूणांची एकच झुंबड उडाली आहे. आतापर्यंत या पदांसाठी तब्बल 2 कोटी अर्ज आले आहेत. याचा अर्थ एका पदासाठी 200 जण इच्छूक आहेत. ऑनलाईन नोंदणीची मुदत संपण्यासाठी आणखी पाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे हा आकडा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये खासगी क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्या आहेत. परिणामी चतुर्थ श्रेणीच्या पदांसाठीही अनेकांनी अर्ज केले आहेत. रेल्वेसह केंद्र आणि राज्य सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदं भरणार आहे. या मेगा भरतीची सुरुवात केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील २४४ कंपन्यांपासून होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून या मेगाभरतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. कामगार मंत्रालय सध्या विविध खात्यांमध्ये असलेल्या रिक्त पदांची माहिती घेत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर नव्या योजनेचा योग्य आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक तत्वावर ही रिक्त पदं भरण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.प्रशासनावर होणार खर्च कमी करण्यासाठी नोकर भरती थांबवली होती. त्यामुळे अनेक पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त आहेत. पण, आता येत्या काही महिन्यात हे चित्र बदलणार असल्याचं समोर येतं आहे. सध्या केंद्रीय मंत्रालय स्तरावरील ६ लाखाहून अधिक पदं रिक्त आहेत. केंद्रीय पातळीवर ही योजना यशस्वी झाल्यास राज्य पातळीवरदेखील ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. यात सुमारे २० लाख युवकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. कामगार मंत्रालयाकडून लवकरच सगळ्या मंत्रालंयांना आणि सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायजेसला यासंबंधी पत्र लिहून तेथिल रिक्त जागांची माहिती दिली जाणार आहे.
जागा एक, अर्ज २००; रेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 17:52 IST