सुशांत मोरे, मुंबई विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या निवडणूक काळात कायदा व सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवर मात्र याचा प्रचंड ताण पडणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील शहर आणि उपनगरांतील रेल्वे स्थानक आणि परिसरातील गुन्हेगारीला आळा घालणाऱ्या रेल्वे पोलिसांनाही निवडणुकीतील बंदोबस्ताची जबाबदारी देण्याची योजना असून, यामुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनचा पसारा हा खोपोली, कसारा आणि हार्बरचा पनवेल, उरणपर्यंत असून पश्चिम रेल्वेचा पसारा डहाणूपर्यंत आहे. या रेल्वे मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी जीआरपीकडे (गव्हर्नमेन्ट रेल्वे पोलीस) आहे. रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तसेच लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जीआरपी तैनात असतात. स्थानक आणि परिसरातील गुन्हेगारी रोखणे तसेच गुन्ह्यांचा तपास करण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. असे जवळपास ३,५00 जीआरपी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३,५00 जीआरपींपैकी जवळपास दीड हजार जीआरपींना मुंबईबाहेर बंदोबस्तासाठी जावे लागले होते. यात ८00 जीआरपींची पहिली तुकडी ३ आणि ४ एप्रिल रोजी मुंबईबाहेर पाठवण्यात आली होती, तर ७00 जीआरपींची दुसरी तुकडी तीन दिवसांनंतर पाठवण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या दोन हजार हजार रेल्वे पोलिसांवर सुरक्षेची जबाबदारी होती.यंदाही तेवढ्याच प्रमाणात रेल्वे पोलीस विधानसभेतील निवडणुकीच्या कामकाजासाठी मुंबईत आणि त्याबाहेर पाठवण्यात येतील, असे रेल्वे पोलिसांतील सूत्रांनी सांगितले. मात्र अद्याप याबाबत निर्णय होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. जवळपास दीड हजार रेल्वे पोलीस विधानसभेच्या कामकाजासाठी जुंपल्यास प्रवाशांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होणार आहे.
रेल्वे पोलीसही होणार ‘बीझी’
By admin | Updated: September 23, 2014 02:55 IST