New Delhi Railway Station Stampede: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीची माहिती सभागृहात माहिती दिली. प्रयागराजमधील महाकुंभ येथे जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी उसळली होती. मात्र त्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्र अश्विनी वैष्णव यांनी हा अपघात कशामुळे याचे कारण सांगितले आहे.
फेब्रुवारी महिन्यात महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आणि १५ जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीत ४ मुले आणि ११ महिलांचाही मृत्यू झाला. अपघाताच्या काही दिवसांनंतर, रेल्वे संरक्षण दलाच्या अहवालात प्रयागराजला जाणाऱ्या कुंभ स्पेशल ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे हा अपघात झाला. आता १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाच्या डोक्यावर सामान पडल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे सरकारने सांगितले आहे. सामान पडल्याने प्रवासी पायऱ्यांवर पडले होते, असं मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी विचारलेल्या प्रश्नावर अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिलं. १५ फेब्रुवारीच्या दुःखद घटनेच्या उच्चस्तरीय चौकशी समितीला असे आढळून आले आहे की प्रवाशाच्या डोक्यावरून सामान पडणे हे चेंगराचेंगरीचे मुख्य कारण होते. "प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी हजारो लोक रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. रात्री ९:१५-९:३० च्या सुमारास, प्लॅटफॉर्म १४-१५ ला जोडणाऱ्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी झाली. एका प्रवाशाच्या डोक्यावरून एक जड वस्तू पडली, ज्यामुळे प्लॅटफॉर्म १४/१५ च्या पायऱ्यांवरील प्रवासी अडखळले. यामुळे रात्री ८.४८ वाजता तीन नंबरच्या पादचारी पुलावर हा अपघात झाला. शवविच्छेदन तपासणीनुसार, पीडितांचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला," असं वैष्णव यांनी म्हटलं.
"गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती पण रात्री ८:१५ नंतर पादचारी पुलावर प्रवाशांची संख्या खूप वाढली. अनेक प्रवासी डोक्यावर जड सामान घेऊन जात होते, ज्यामुळे २५ फूट रुंदीच्या पादचारी पुलावर हालचाल करण्यास अडथळा येत होता," असेही सांगण्यात आलं. रेल्वेमंत्र्यांनी मार्चमध्ये लोकसभेत सांगितले होते की अपघाताच्या दिवशी रेल्वे स्थानकावर सुमारे ४९ हजार जनरल तिकिटे विकली गेली होती. ही संख्या दैनंदिन सरासरीपेक्षा १३ हजारांनी जास्त होती. तर एकाच नावाच्या दोन गाड्यांमुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला असं रेल्वे पोलिसांनी सांगितले होते.