नवी दिल्ली : काँग्रेसने मतदार याद्यांतील गैरप्रकाराच्या विरोधातील आपली मोहीम आणखी तीव्र करताना बुधवारी एक व्हिडीओ जारी केला व जास्तीत जास्त लोकांनी याच्याशी जोडले जावे, असे आवाहन केले. त्याचबरोबर निवडणूक आयोगाला निवडणूक चोरी आयोग, असे संबोधले आहे.
काँग्रेसने आपल्या विविध सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून एक मिनिटाचा व्हिडिओ जारी केला आहे. त्यात दोनजण मतदार केंद्राबाहेर निघताना दाखविले आहेत. तेथे दाखल झालेला एक वृद्ध पुरुष व एका महिलेला ते सांगतात की, तुम्ही परत जा. तुमचे मत आधीच टाकलेले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक व्हिडीओ शेअर करीत एक्सवर म्हटले आहे की, तुमचा मताचा अधिकार हिरावून घेऊ देऊ नका. प्रश्न विचारा, उत्तर मागा. मतचोरीविरोधात आवाज उठवा. संवैधानिक संस्थांना भाजपपासून मोकळे करा. पक्ष सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे.
राहुल गांधी, 'इंडिया'ची व्होटर अधिकार यात्रा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते व इंडिया आघाडी बिहारमध्ये दि. १७ ऑगस्ट रोजी व्होटर अधिकार यात्रा काढणार आहेत. मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण व कथित मतचोरीच्या विरोधात ही यात्रा काढण्यात येणार आहे. सासाराममधून यात्रेला सुरूवात होईल व १ सप्टेंबर रोजी पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानात सांगता होईल.
चंद्राबाबू नायडू राहुल गांधी यांच्या संपर्कात : रेड्डी
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत, असा दावा आंध्रचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी म्हटले आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आंध्रात निकालामध्ये १२.५ टक्क्यांचा फरक आहे, असा दावाही जगनमोहन रेड्डी यांनी केला आहे.
आयोग अन् भाजपचे संगनमत : तेजस्वी यादव निवडणूक आयोगाने मतचोरीसाठी भाजपबरोबर संगनमत केले आहे, असा आरोप राजद नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. आयोग राज्यातील भाजप नेत्यांना दोन मतदान ओळखपत्र मिळवण्यात मदत करीत आहे, असे ते म्हणाले.
सोनिया गांधी यांच्यावर भाजपचा नवा आरोप
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी भारतीय नागरिक होण्यापूर्वीच मतदाराच्या रूपात नोंदणीकृत झाल्या होत्या, असा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, त्यांचे नाव प्रथम १९८०च्या यादीत आले. भारतीय नागरिक होण्याआधी तीन वर्षेआधी हे नाव आले. तेव्हा त्या इटालीच्या नागरिक होत्या.