वॉशिंग्टन, दि. 12 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कॅलिफॉर्निया युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांना संबोधित केले. भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, प्रश्नोत्तरावेळी पुन्हा एकदा राहुल गांधी चुकले आहेत. ज्यावरुन सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे. लोकसभेतील सदस्यांची संख्या 545 एवढी आहे. मात्र, एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी लोकसभेतील सदस्यांची संख्या 546 एवढी सांगितली. या चुकीवरुन सोशल मीडियावर राहुल गांधी यांची खिल्ली उडवली जात आहे.
घराणेशाहीवर नेमके काय म्हणाले राहुल गांधी?दरम्यान, घराणेशाहीवरुन राहुल गांधी यांना टार्गेट केले जाते. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'घराणेशाहीवरुन केवळ काँग्रेस पक्षावर निशाणा साधू नये, आमच्या देशात अशाच पद्धतीनं काम चालत आहेल आहे. अखिलेश यादव, एम.के.स्टॅलिन, एवढंच नाही तर राहुल यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीचं उदाहरण देण्यासाठी अभिषेक बच्चनच्याही नावाचा उल्लेख केला. त्यामुळे घराणेशाहीसंदर्भात मी काहीही करु शकत नाही, असेही पुढे ते म्हणालेत. आता तर मुकेश अंबानी यांच्यानंतर इन्फोसिसमध्येही घराणेशाही दिसून येत असल्याचं त्यांनी विधान केले.
BJPची लोकं माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत - राहुल गांधीराहुल गांधी यांनी यावेळी असेही म्हटले की, भाजपामधील काही जण केवळ कम्प्युटरसमोर बसून माझ्याविरोधात बोलणी करत आहेत, माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत. मी मूर्ख आहे, मी असा आहे, मी तसा आहे, असा माझ्याविरोधात ते अजेंडा राबवत आहेत. आता देशात काही मंत्र्यांमध्ये बोलणी होऊन कायदे बनवले जात आहेत, मात्र जर काँग्रेसची सत्ता आली तर जनतेशी संवाद साधून कायदे बनवू. आता देशाची संसद नाही तर केवळ पीएमओ मजबूत आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम वक्तेदरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा उत्तम वक्ते आहेत, अशी कबुलीही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली. मात्र स्तुती करण्याच्या बहाण्याने त्यांनी मोदींवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. 'पंतप्रधान मोदींकडे काही कौशल्यं आहेत. नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम वक्ते आहेत', असं राहुल गांधी सुरुवातीला म्हटले. नंतर 'गर्दीतील तीन ते चार वेगवेगळ्या गटांपर्यंत आपला संदेश कसा पोहोचवायचा हे मोदींना चांगलंच माहिती आहे. आपला संदेश पोहोचवण्याची त्यांची क्षमता प्रभावी आहे', असंही राहुल गांधी म्हणालेत.
...तर पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार - राहुल गांधी दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी पहिल्यांदाच म्हटले आहे की, पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार आहे. शिवाय, 2012मध्ये काँग्रेस पक्षामध्ये अहंकार निर्माण झाला होता आणि पक्षानं जनतेशी संवाद कमी केल्याने लोकं दुरावली. लोकांसोबतच संवाद कमी होत गेल्यानेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, असे मतही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केले.
राहुल गांधींनी दिली मोठी राजकीय कबुली - स्मृती इराणी
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला अहंकार चढला होता. त्यामुळे पराभव पत्कारावा लागला, हे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे त्यांनी दिलेली मोठी राजकीय कबुली आहे,असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. राहुल गांधी यांनी मंगळवारी अमेरिकेतील बर्कले येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. या टीकेचा समाचार घेताना स्मृती इराणी म्हणाल्या की, देशात पाठिंबा मिळत नाही, म्हणून राहुल गांधी परदेशातल्या भूमीवर आपलं दु:ख, व्यथा सांगत आहेत. घराणेशाही देश चालवते, असे राहुल गांधी म्हणतात, पण आपले पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे घराणेशाहीतून आलेले नाहीत याकडे स्मृती इराणींनी लक्ष वेधले.