सरकारी आणि सहकारी बँकांमध्ये अफरातफर झाल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने सर्वसामान्य ठेवीदार चिंतीत आहेत. त्या दरम्यान आता देशातील एका प्रमुख बँकेत पुन्हा एकदा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेमध्ये २७०.५७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. ओदिशामधील गुप्ता पॉवर इफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने हा घोटाळा केला आहे. बँकेने या फसवणुकीची माहिती रिझर्व्ह बँकेला दिली आहे. हे कर्ज भुवनेश्वरमधील स्टेशन स्क्वायर ब्रँचमधून घेण्यात आलं होतं.
पंजाब नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीमुळे बँकेला प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला. गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरचं कर्ज आधीच नॉन परफॉर्मिंग अॅसेटमध्ये परिवर्तित झालेलं होतं. आता या कर्जाची नोंद रिझर्व्ह बँकेकडे बँक फ्रॉड म्हणून करण्यात आली आहे.
याआधी पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदीने केलेल्या १३ हजार ५७८ कोटींच्या घोटाळ्यामुळे नुकसानीचा सामना करावा लागला होता. तसेच २०२४ मधील आकडेवारीनुसारर बँक घोटाळ्यांच्या प्रमाणात २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२४-२५ च्या पहिल्या सहामाहीमध्ये बँकिंग घोटाळ्याच्या एकूण १८ हजार ४६१ प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यामध्ये एकूण २१ हजार ३६७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. तर एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये बँक फ्रॉडची १४ हजार ४८० प्रकरणं समोर आली होती.