प्रसन्न पाध्ये, घुमान (संत नामदेव नगरी) :पंजाब आणि महाराष्ट्राचे अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने दोन्ही राज्यातील नागरिकांमध्ये प्रेम, बंधूभाव वाढेल, असा विश्वास स्वागत समितीतील सदस्य, माजी आमदार चरणजितसिंग सप्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.संमेलन मराठी सारस्वतांचे आणि मराठी भाषिक लोकांचे असले तरी या संमेलनाचे वैशिष्ट्य पंजाबातील घुमान या छोट्याशा गावी होत आहे. या संमेलनाला पंजाब सरकाराने पूर्ण पाठींबा दिला असल्याने सर्व सरकारी यंत्रणा, विविध संस्था हे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. संत नामदेव यांच्याविषयी पंजाबी लोकांना आस्था असल्याने महाराष्ट्रातील पंजाबी नागरिकही या संमेलनाकडे आपलेपणाने पाहात आहे.माजी आमदार आणि स्वागत समितील सदस्य सप्रा या संमेलनास मुंबईहून आले आहेत. या निमित्त त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘संत नामदेव आणि गुरुगोविंदसिंहजी यांच्यामुळे महाराष्ट्र आणि पंजाब एका वेगळ्या नात्यात जोडला गेला आहे. गुरुगोविंदसिंहजी आमच्यासाठी जेव्हढे पूजनिय आहेत, तेवढेच संत नामदेवही आहेत. त्यामुळे पंजाब आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये जिव्हाळ्याचे नाते आहे.’’पंजाबातून अनेकजण आएएस, आयपीएस झाले. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्रात आपलेपणानेच सेवा केली असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र अॅन्ड पंजाब कॉ. आॅप. बॅँक सुरू करण्यात आली आहे. या बॅँकेत ७० टक्के कर्मचारी महाराष्ट्रीय आहेत. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधतर्फे मुंबईत खालसा कॉलेज सुरू करण्यात आले आहे. या कॉलेजचे भूमिपूजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झाल्याची आठवण सप्रा यांनी सांगितली. या संमेलनामुळे पंजाब आणि महाराष्ट्रासाठी नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
पंजाब-महाराष्ट्रातील नातेसंबंध दृढ होईल : चरणजितसिंग सप्रा
By admin | Updated: April 4, 2015 00:03 IST