ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही राज्याला पारदर्शी आणि विकासाकडे देणारे सरकार देऊ अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्यावर आज गोपीनाथ मुंडेंची आठवण येत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
मंगळवारी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाली. या निवडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यातील जनतेचे प्रतिनिधी असून हे 'जनतेचं सरकार' असेल असे आश्वासन मी जनतेला देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाला अनुसरुन राज्याचा कारभार चालेल अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणा-या सर्व आमदार आणि पक्ष नेत्यांचेही त्यांनी आभार मानले.