वॉशिंग्टन: भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील दुसऱ्या टप्प्याचा कणा मानल्या जाणाऱ्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरने (पीएफबीआर) नियंत्रित साखळी अभिक्रिया (क्रिटिकॅलिटी) साध्य केली असून, या ऐतिहासिक कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे. तामिळनाडूच्या कल्पक्कम येथे स्थित असलेल्या या रिॲक्टरचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा आयोगाने भरभरून कौतुक केले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी या यशाला ‘इंधनाच्या दीर्घकालीन स्थिरतेसाठी टाकलेले निर्णायक पाऊल’ असे संबोधले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.
रशियानंतर भारत केवळ दुसरा देश
रशियानंतर अशा प्रकारची प्रगत तंत्रज्ञान प्रणाली विकसित करणारा भारत हा जगातील केवळ दुसरा देश ठरला आहे. विशेष म्हणजे, अमेरिका आणि जपान यांसारख्या राष्ट्रांनी ज्या किचकट तंत्रज्ञानाचा नाद सोडला होता, ते तंत्रज्ञान भारतीय अभियंत्यांनी यशस्वी करून दाखवले आहे.
६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजून २५ वाजता ही ऐतिहासिक घटना घडली. आता पुढील काही महिन्यांत विविध चाचण्यांनंतर हा रिॲक्टर वीज ग्रिडशी जोडला जाईल, ज्यामुळे भारताच्या ऊर्जासुरक्षेत मोठी क्रांती घडून येईल.
‘क्रिटिकॅलिटी’ म्हणजे काय?
ही अणुभट्टीतील ती अवस्था आहे, जिथे नियंत्रित साखळी अभिक्रिया स्वतःहून सातत्याने सुरू राहते. यात न्यूट्रॉनची निर्मिती आणि त्यांचा वापर यांचा समतोल राखला जातो, ज्यामुळे सुरक्षितपणे वीजनिर्मिती करणे शक्य होते. ‘क्लोज्ड फ्युएल सायकल’चे महत्त्व : हा रिॲक्टर वापरलेल्या अणुइंधनावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरतो. यामुळे अणुकचऱ्याची समस्या कमी होते आणि उपलब्ध इंधनाचा जास्तीत जास्त वापर होतो. हे तंत्रज्ञान भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
भविष्यातील पाऊल : शास्त्रज्ञ आता प्रारंभिक भौतिकी चाचण्या पूर्ण करतील. टप्प्याटप्प्याने वीजनिर्मितीची क्षमता वाढवून हा प्रकल्प नॅशनल ग्रिडशी जोडला जाईल. सध्याच्या प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्समधून निघणाऱ्या इंधनाचा पुनर्वापर या ठिकाणी केला जाईल.
थोडक्यात : भारताने दोन दशकांच्या परिश्रमानंतर हे यश मिळवले असून, जगाच्या अणुऊर्जा नकाशावर भारताचे स्थान बळकट झाले आहे.
प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर प्रकल्पाची वैशिष्ट्ये
घटक - तपशील
- स्थान - कल्पक्कम, तामिळनाडू
- विकसित करणारी संस्था - भारतीय नाभिकीय विद्युत निगम (भाविनी)
- इंधन - प्लुटोनियम आधारित मिश्रित ऑक्साइड (एमओएक्स)
- कुलंट (थंड ठेवण्यासाठी) - द्रव सोडियम
- जागतिक स्थान - रशियानंतर हे तंत्रज्ञान असणारा भारत दुसरा देश.
Web Summary : India's Prototype Fast Breeder Reactor achieved criticality, lauded internationally. Developed in Kalpakkam, it uses plutonium-based fuel and liquid sodium coolant. India is only the second country after Russia to achieve this feat, boosting energy security.
Web Summary : भारत के प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर ने क्रिटिकैलिटी हासिल की, जिसकी अंतरराष्ट्रीय स्तर पर सराहना हुई। कल्पक्कम में विकसित, यह प्लूटोनियम आधारित ईंधन और तरल सोडियम शीतलक का उपयोग करता है। भारत रूस के बाद यह उपलब्धि हासिल करने वाला दूसरा देश है, जिससे ऊर्जा सुरक्षा को बढ़ावा मिलेगा।