जपानकडून घेणार संरक्षण तंत्रज्ञान
By admin | Published: May 10, 2017 12:49 AM2017-05-10T00:49:18+5:302017-05-10T00:49:18+5:30
भारत जपानसोबतचे लष्करी साहाय्य वाढवीत आहे. त्याचप्रमाणे जपानकडून संरक्षण तंत्रज्ञान प्राप्त करण्यात भारताला रस आहे,
टोकियो : भारत जपानसोबतचे लष्करी साहाय्य वाढवीत आहे. त्याचप्रमाणे जपानकडून संरक्षण तंत्रज्ञान प्राप्त करण्यात भारताला रस आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. जपानी तंत्रज्ञानाच्या साह्याने देशांतर्गत शस्त्रास्त्र आणि लष्करी उपकरणांची निर्मिती करण्यात येईल, असेही ते म्हणाले.जेटली यांनी काल जपानचे संरक्षणमंत्री तोमोमी इनाडा यांची
भेट घेतली. यासंदर्भात त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, भारत आणि जपान यांच्यातील लष्करी संबंध अत्यंत मजबूत आहेत.
विभागीय शांतता आणि स्थैर्यासाठी दोन्ही देश रणनीतिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी पाठपुरावा करतील.
जेटली म्हणाले की, भारत आणि जपान यांच्यात नियमितपणे प्रशिक्षण आणि नौदल सराव होतो. याशिवाय दोन्ही देश इतरही अनेक पातळ्यांवर एकमेकांना सहकार्य करीत असतात. स्थानिक पातळीवर संरक्षण उपकरणे निर्माण करण्यासाठी जपानी तंत्रज्ञान मिळविण्याचा भारताचा मानस आहे. जपानकडे अनेक प्रकारचे लष्करी तंत्रज्ञान आहे.
भारताला त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. कारण आम्ही भारतात स्थानिक पातळीवर लष्करी उपकरणे बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत. (वृत्तसंस्था)
भारत आणि जपान व्यवसाय-ते-व्यवसाय या पातळीवर सहकार्य करार करण्याची शक्यता तपासून पाहत आहेत. जपानी तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत दोन पातळ्यांवर विचार करीत आहे. हे तंत्रज्ञान जपानकडून विकत घेणे हा एक पर्याय आहे, तसेच जपानचे तंत्रज्ञान वापरून भारतात युद्ध साहित्याची निर्मिती करणे हा दुसरा पर्याय आहे.
- अरुण जेटली