अहिंसा हा आपला मुळ स्वभाव आहे. मात्र काही लोक बिघडलेले आहेत. मी मुंबईत रावणाचा उल्लेख केला होता. कारण रावणात सर्व काही होते, पण त्याचे मन अहिंसे विरोधात होते. यामुळे रामाने त्याचा वध केला. याच प्रकारे गुंडांकडून मार न खाणेही आपला धर्म आहे. त्यांना धडा शिकवणे आपला धर्म आहे. आम्ही शेजाऱ्यांना कधीही त्रास देत नाही. मात्र, ते आपल्या धर्माचे पालन करणार नसतील तर आपल्या प्रजेचे रक्षण करणे हा राजाचा धर्म आहे. यामुळे राजा आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी जे पावले उचलेल, ते लोक लक्षात ठेवतील, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत बोलत होते.
दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रम सरसंघचालक मोहन भागवत आणि उपस्थितांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांसाठी दोन मिनिटांचे मौन पाळले. या कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांनी देशातील सध्याच्या ज्वलंत आव्हानांवर आपला दृष्णिकोण जगासमोर ठेवला.
भागवत पुढे म्हणाले, या आयोजनात हिंदू मॅनिफेस्टोचा विषय दिसला. हे एक असे प्रपोजल आहे ज्याची सर्वांनी चर्चा करायला हवी आणि ज्यावर सर्वांची सहमती व्हायला हवी. अशा सहमतीची आवश्यकता काय? तर जगाला नवा मार्ग हवा आहे. विश्व कल्याणासाठी, मानवतेच्या रक्षणासाठी मानवतेसाठी तिसरा मार्ग हवा आहे. तो भारताकडे आहे. तो भारताने आपल्या परंपरेतून द्यायला हवा.
'केवळ कर्मकांड म्हणजे धर्म नाही' -"आपण धर्माला केवळ कर्मकांडच समजलो. आपण धर्म प्रार्थनास्थळे आणि खाण-पाणाच्या पद्धतीशी जोडला. अर्थात पूजापाठा आणि काय खावे यातच धर्म मानला. सर्वांचे मार्ग त्यांच्यासाठी योग्य असतात. माझा मार्ग माझ्यासाठी योग्य आहे, पण मी इतरांच्या मार्गाचाही आदर करतो. मात्र, माझेच चांगले आणि इतरांचं वाईट असे नसावे. आज हिंदू समाजाला हिंदू धर्म समजून घेण्याची गरज आहे," असेही भागवत म्हणाले.