लोकमत ऑनलाइन
मुंबई, दि. ४ - प्रियंका गांधींना कसला धोका आहे, त्या स्वत:च आतंकवादी आहेत असं म्हणत भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. गांधी परीवाराबद्दल सतत वेगवेगळे आरोप करत चर्चेत राहणा-या स्वामी यांनी ज्या दहशतवाद्यांपासून गांधी घराण्याला धोका होता ती लिट्टे ही तामिळ दहशतवादी संघटना संपल्याचे सांगत मुस्लीमांचे लांगूलचालन करणा-या गांधींना मुस्लीम दहशतवादी संघटनांपासून धोका नसल्याचा दावा केला. त्यामुळे प्रियंका गांधी त्यांचे पती रॉबर्ट वद्रा आदींची सुरक्षा काढून घ्यावी अशी मागणी स्वामींनी केली आहे.
एवढेच नव्हे तर प्रियंक गांधी बहुतांश काळ दुबईमध्ये असतात आणि भलत्यासलत्या लोकांना भेटत राहतात असे सांगत त्या काहीही काम करत नाहीत, मग त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय असा प्रश्नही स्वामींनी उपस्थित केला आहे. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना स्वामींनी ही फटकेबाजी केली आहे.