ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ४ - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर प्रियंका गांधी या राजकारणात उतरणार असल्याची चर्चा आहे. या वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीनंतर प्रियंका गांधी यांना काँग्रेसमध्ये महत्त्वाचे पद दिले जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली असून त्यांच्याकडे पक्षाचे महासचिव किंवा उत्तरप्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार दिला जाऊ शकतो.
लोकसभा निवडणुकीपासून प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावे अशी मागणी काँग्रेसचेच कार्यकर्ते करत होते. मात्र प्रियंका गांधी यांनी राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघांमध्येच सोनिया गांधी व राहुल गांधींसाठी प्रचार केला होता. निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वावर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी या राहुल गांधींना पाठबळ देण्यासाठी सक्रीय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. गांधी घराण्याशी जवळीक असलेल्या तीन नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रियंका गांधी यांच्याकडे महासचिव किंवा उत्तरप्रदेश प्रदेशाध्यक्ष पद दिले जाऊ शकते. सध्या महासचिव पदावर जनार्दन त्रिवेदी तर उत्तरप्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष पदावर निर्मल खत्री आहेत.
प्रियंका गांधी या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच पक्षात काम करतील. यामध्ये राहुल गांधी यांना डावलून प्रियंका गांधींना पुढे आणण्याचा प्रयत्न नाही असे एका काँग्रेस नेत्यांने इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. उत्तरप्रदेशमध्ये अमित शहा यांना काँग्रेसमधून फक्त प्रियंका गांधीच टक्कर देऊ शकतात असे काँग्रेस नेत्यांनी पक्षनेतृत्वाला सांगितले आहे. अमित शहांप्रमाणेच प्रियंका गांधी यांचाही कार्यकर्त्यांशी संपर्क चांगला असून या संघटन कौशल्याची पक्षाला आवश्यकता आहे. आता प्रियंका गांधींविषयीचा अंतिम निर्णय सोनिया गांधी आणि राहुल गांधी घेतील असे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.