ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १ - भारताचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी बुधवारी दुरदर्शनवर दिलेली मुलाखत वादाच्या भोव-यात सापडली आहे. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी प्रियंका गांधी ही माझ्या मुली समान आहे असे विधान केले होते. मात्र दुरदर्शनने ते विधान कापून मुलाखत दाखवल्याचा आरोप मोदी समर्थकांनी केला आहे. २७ एप्रिल रोजी दुरदर्शनवर 'खास मुलाखात' या कार्यक्रमात नरेंद्र मोदींची मुलाखत दाखवण्यात आली होती. २५ एप्रिल रोजी या कार्यक्रमाचे चित्रीकरण पार पडले होते. मात्र तब्बल दोन दिवसांनी हा कार्यक्रम प्रसारीत करण्यात आला होता. यावरुनही सोशल नेटवर्किंग साईट्सवर मोदी समर्थकांनी दुरदर्शनवर टीकेची झोड उठली होती. आता मुलाखत प्रसारीत झाल्यावरही वाद शमण्याची चिन्हे नाहीत. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींना प्रियंका गांधींविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मोदी म्हणाले, प्रियंका गांधी माझ्या मुलीप्रमाणे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मुलींना लक्ष्य करण्याची परंपरा नाही. प्रियंका सोनिया गांधी व राहुल गांधींप्रमाणे माझी राजकीय विरोधक नाही असेही मोदींनी सांगितले होते. पण दुरदर्शनने नेमका हाच भाग मुलाखतीतून वगळल्याचा दावा मोदी समर्थक करत आहेत. मोदींच्या या विधानामुळे नवीन राजकीय वाद निर्माण झाला असता. त्यामुळे दूरदर्शनने हे वाक्य वगळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.