PM Modi On Made In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी रिफॉर्मची घोषणा करताना राष्ट्राला उद्देशून भाषण सुरू केले आहे. नवरात्रीच्या एक दिवस याची घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार असल्याचे म्हटलं. व्यापारी असोत, गरीब असोत किंवा मध्यमवर्गीय असोत, सर्वांनाच याचा फायदा होईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. दुसरीकडे, अमेरिकेच्या टॅरिफच्या मुद्द्यावरुन वातावरुन तापलेलं असताना पंतप्रधान मोदींनी पुन्हा मेक इन इंडियाची घोषणा दिली. स्वदेशीचा मंत्र देशाला सक्षम करेल. अनेक परदेशी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत, आपण त्यापासून स्वतःला मुक्त केले पाहिजे, असं पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या जीएसटी रिफॉर्मचे वर्णन पुढील पिढीतील सुधारणा असे केले आहे. त्यांनी देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन आपल्या भाषणाची सुरुवात केली. २२ सप्टेंबरपासून सुरू होणारा जीएसटी बचत महोत्सव प्रत्येक कुटुंबात आनंद घेऊन येईल आणि बचत वाढवेल. काळ बदलतो आणि देशाच्या गरजा बदलतात, तसतसे पुढील पिढीतील सुधारणांची गरज देखील वाढते. म्हणूनच, देशाच्या सध्याच्या गरजा आणि भविष्यातील स्वप्ने लक्षात घेऊन या नवीन जीएसटी सुधारणा अंमलात आणल्या असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी स्वावलंबी भारतासाठी सर्व राज्यांनी पुढे यावे असंही म्हटलं. "मी सर्व राज्य सरकारांना आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी मोहिमेत सामील होण्याची आणि त्यांच्या राज्यात उत्पादन वाढवून गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची विनंती करतो. जेव्हा राष्ट्र आणि राज्ये एकत्र काम करतील तेव्हा आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
तसेच भाषणात पंतप्रधान मोदींनी लोकांना स्वदेशी वस्तू स्वीकारण्याचे आवाहन केले. "देशाचे स्वातंत्र्य स्वदेशी चळवळीने बळकट केले. त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या समृद्धीची मोहीम स्वदेशीमुळे बळकट होईल. अनेक परदेशी वस्तू दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. आपण त्याही काढून टाकल्या पाहिजेत. आपण मेड इन इंडिया वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. आपल्याला फक्त अशाच वस्तू खरेदी कराव्या लागतील ज्या भारतात बनवल्या जातील, ज्यामध्ये आपल्या देशातील तरुणांचे कष्ट आणि ज्याच्यासाठी आपल्या मुला-मुलींनी घाम गाळलेला असेल. आपण प्रत्येक घराला स्वदेशीचे प्रतीक बनवले पाहिजे. प्रत्येक दुकान स्वदेशीने सजवले पाहिजे. अभिमानाने सांगा की मी स्वदेशी वस्तू खरेदी करतो," असेही पंतप्रधान म्हणाले.