PM Modi address to nation news: पंतप्रधाननरेंद्र मोदी आज सायंकाळी पाच वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी कोणत्या मुद्द्यावर देशवासियांशी संवाद साधणार आहेत, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्याचबरोबर नवीन जीएसटी दरही लागू होत आहेत. या मुद्द्यांवर मोदी बोलणार असल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे.
अनेक वर्षांपासून जीएसटीमध्ये सुधारणा करण्याची मागणी सुरू होती. त्यासंदर्भात अलिकडे जीएसटी परिषदेने मोठा निर्णय घेतला. जीएसटीतील दोन कर रचना रद्द करण्यात आल्या असून, आता दोनच कर रचना असणार आहेत.
वाढत्या महागाईच्या झळा कमी व्हाव्यात आणि उपभोग वाढावा म्हणून केंद्र सरकारकडून हा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे. जीएसटी दरातील कपातीचा थेट फायदा लोकांना व्हावा, याकडे केंद्र सरकारचे लक्ष असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी बोलणार असल्याची चर्चा आहे.
अमेरिकेने ५० टक्के टॅरिफ लादल्यामुळे व्यापारवरही परिणाम झाला आहे. स्वदेशी वस्तुंना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही मोदी वारंवार करत आहेत. या मुद्द्यावरही ते आपल्या भाषणात बोलू शकतात, अशी चर्चा आहे.