अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स सध्या सहकुटुंब ४ दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. वेन्स कुटुंब सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जेडी वेन्स, त्यांची पत्नी उषा वेन्स आणि मुले - ईवान, विवेक आणि मिराबेल यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळीचा सर्वात खास क्षण म्हणजे, जेव्हा पंतप्रधान मोदींनी आपल्या हाताने वेन्स यांच्या तिनही मुलांना मोर पंख भेट दिला. मोर पंख हा भारतीय संस्कृतीत सौभाग्याचे आणि शांतीचे प्रतिक मानले जातो. वेन्स पंतप्रधानांच्या निवास्थानी पोहोचल्यानंतर, पंतप्रधानांनी गळाभेट घेऊन वेन्स यांचे स्वागत केले. त्यांची पत्नी उषा यांच्यासोबत चर्चा केली. यावेळचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पंतप्रधान मोदी वेन्स यांच्या मुलांसोबत खेळतानाही दिसत आहेत.पंतप्रधान मोदींनी मोर पंख देताच मुलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हास्य फुलले होते. यापूर्वी वेन्स यांनी अक्षरधाम मंदिरातही दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या मुलांनी पारंपारिक भारतीय पेहराव केला होता. इवान आणि विवेक कुर्ता पायजमा तर मीराबेल अनारकली सूट परिधान केला होता. पंतप्रधानांच्या भेटीनंतर वेन्स यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, "भारताने आम्हाला ज्या प्रेमाने आणि उत्साहाने स्वीकारले, आम्ही आभारी आहोत. महत्वाचे म्हणजे, मुलांना मंदिराची भव्यता विशेष आवडली."
'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा -या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी आणि उपाध्यक्ष वेन्स यांनी, याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या भेटीनंतर, द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील प्रगती, ऊर्जा, संरक्षण आणि धोरणात्मक तंत्रज्ञानातील सहकार्य वाढविण्याच्या प्रयत्नांचे स्वागत केले. यावेळी परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, आपण या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या भारत भेटीची प्रतीक्षा करत आहोत, असेही म्हणाले.