ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २९- इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले असून याअंतर्गत भारतीय नौदलाच्या दोन युद्धनौका पारस खाडीत तैनात केल्या आहेत. आपातकालीन परिस्थितीत वायू सेनेच्या विमानांची मदत घेण्याची तयारीही भारत सरकारने केली आहे.
इराकमध्ये सुन्नी दहशतवाद्यांनी काही शहरांवर ताबा मिळवला असून या शहरांमध्ये १०० हून अधिक भारतीय अडकले आहेत.यात केरळ, पंजाब अशा विविध राज्यांमधील नागरिकांचा समावेश आहे. या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहे. सध्या नौदलाच्या दोन युद्ध नौका पारस खाडीत दाखल झाल्या असून वेळप्रसंगी वायू दलाचे दोन विमानही इराकमध्ये पोहोचतील. आपातकालीन स्थितीत नौदल व वायूदलाच्या मदतीने भारतीयांची सुटका केली जाईल असे परराष्ट्र खात्यातील अधिका-यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन म्हणाले, इराकमधील भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी भारताने आपातकालीन योजना तयार केली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज रविवारी आखाती देशातील परिस्थितीचा आढावा घेणार असून आखाती देशांमधील भारतीय प्रतिनिधींशी त्या चर्चा करणार आहेत.
दरम्यान, भारत सरकारने आत्तापर्यंत इराकमधून ४० भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात यश मिळवले आहे. इराकमधील नजफ, बसरा आणि करबला येथे भारत सरकारने भारतीयांच्या मदतीसाठी ३ मदत केंद्र सुरु केल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.