मुंबई : नेस वाडिया यांच्याविरुद्ध छेडछाडीची तक्रार करणारी प्रीती रविवारी सकाळी मुंबईत दाखल झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी मुंबई पोलीस तिच्याकडे उद्या (सोमवारी) पुरवणी जबाब घेणार आहेत. तिच्याकडून तपशीलवार माहिती मिळाल्यानंतर तपासातील गुंता दूर होईल, असे सांगण्यात आले. आयपीएलमधील पंजाबच्या संघाची मालकीण प्रीती झिंटा हिने संघातील भागीदार नेसविरुद्ध १२ जूनला मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर ती लॉस एंजलिसला गेली होती. दरम्यानच्या कालावधीत वाडिया कुटुंबीयांना गँगस्टर रवी पुजारीकडून फोनवरून धमकाविण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. प्रीतीकडे छेडछाडीच्या घटनेबरोबरच धमकीच्या अनुषंगाने विचारणा केली जाणार आहे. आयपीएल-७ स्पर्धेमध्ये ३० मे रोजी पंजाब इलेव्हन व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यावेळी नेस वाडिया यांनी अपशब्द वापरले, जबरदस्तीने ओढून खाली बसविले आणि धमकाविल्याची तक्रार प्रीतीने पोलिसांकडे केल्यानंतर त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत आयपीएलचे सीईओ शशी रमण यांच्यासह वानखेडेतील स्टाफचे जबाब नोंदविले आहेत. (प्रतिनिधी)
प्रीती मुंबईत दाखल; आज जबाब नोंदवणार
By admin | Updated: June 23, 2014 03:32 IST