Prashant Kishor On INDIA Alliance: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. काँग्रेसनेही निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. तर आम आदमी पक्षानेही पंजाबमध्ये लोकसभा निवडणुका एकट्याने लढवण्याचे ठरवले आहे. यामुळे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राजकारणातील चाणक्य मानले गेलेले आणि जनसुराजचे नेते प्रशांत किशोर यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीतील फुटीबाबत भाष्य करताना नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.
मीडियाशी बोलताना प्रशांत किशोर यांना इंडिया आघाडीतील फुटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना प्रशांत किशोर म्हणाले की, गेल्या ६-८ महिन्यांपासून हीच गोष्ट सांगत आहे. इंडिया आघाडीतील सर्व बड्या नेत्यांचा मुख्यमंत्री होता यावे, यासाठी प्रचार केला होता. यामध्ये ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलिन, उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री होण्याची आणि निवडणूक जिंकण्याची जबाबदारी त्यांनी या सर्वांच्या खांद्यावर टाकली. असे असतानाही या इंडिया आघाडीत काहीही होणार नाही, असे नेहमीच सांगत आलो आहे. हे सर्व नेते आपापले क्षेत्र स्वतंत्रपणे वाचवण्यात मग्न आहेत. इंडिया आघाडीत एकसूत्रता नाही, धोरण नाही, परस्पर मदतीची तरतूद नाही. यातून काहीही होणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.
INDIA आघाडीबाबत नितीश कुमार ठामपणे सांगू शकले नाहीत
पश्चिम बंगालबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, बिहारमधील आघाडीचे काय, असा सवाल करत, एनडीएमध्ये सर्व काही एका व्यक्तीच्या नावावर आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी. मोदी जे बोलतील ते ठरवले जात आहे. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची संकल्पना मांडली होती. बिहारमधील पाटणा येथे पहिली सभा झाली. असे असताना बिहारमधील जागावाटप आधी जाहीर व्हायला हवे होते. परंतु, तसे आजपर्यंत झालेले नाही. जिथून INDIA चे बीज पेरले गेले, तेथील लोकांचे म्हणणे आहे की, नितीश कुमार यांना संयोजक करावे. बिहारमध्ये इंडिया आघाडीचे काय होईल हे आजपर्यंत नितीश सांगू शकलेले नाहीत, या शब्दांत प्रशांत किशोर यांनी निशाणा साधला.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संधिसाधू आहेत, त्यांच्या दयेवर आम्ही निवडणूक लढवणार नाही. स्वबळावर निवडणुका कशा लढवायच्या हे काँग्रेसला माहीत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये २०११ मध्ये काँग्रेसच्या दयेने ममता स्वत: पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या होत्या, अशी भूमिका चौधरी यांनी स्पष्ट केली.