रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
शिवसेना व भाजपाच्या आक्रमक प्रचाराचा वारू रोखण्यासाठी काँग्रेसही जशास तसे उत्तर देण्याची रणनीती आखत असून, नाराज नेते नारायण राणो यांना राज्यातील विधानसभा निवडणुकीचे प्रचारप्रमुख करण्याचा निर्णय काँग्रेस घेऊ शकते. उपाध्यक्ष राहुल गांधी यांची राणो यांनी गुरुवारी राजधानीत भेट घेतल्यावर हे निश्चित मानले जात आहे.
शुक्रवारी राहुल गांधी हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतरच याबाबत आठवडाअखेर निर्णय होईल. पण तोवर राणो यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करू नये, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कळविण्यात आले आहे. राणो काँग्रेसमधून बाहेर पडणार नाहीत यावरही शिक्कामोर्तब झाले. राहुल यांची राणो यांनी 12, तुघलक लेन या निवासस्थानी सायंकाळी 5 वाजता भेट घेतली. अर्धा तास त्यांची चर्चा झाली. मंत्रिपदाचा राजीनामा का दिला, असा थेट प्रश्न राहुल यांनी राणो यांना विचारल्यावर त्यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कारभारावर टीका केली आणि सोनिया गांधी यांना दिलेले दोन पानांचे पत्र त्यांच्याकडेही सुपुर्द केल्याचे सूत्रंनी सांगितले. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राणो म्हणाले, ‘आपली नाराजी राहुल यांच्या कानावर घातली.
मंत्रिमंडळातून बाहेर का पडलो ते सविस्तर सांगितले. ते आता मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुढील रूपरेषा निश्चित होईल.’