नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवणाऱ्या काही पोस्टर्समुळे शुक्रवारी दिल्लीत खळबळ माजली होती. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तातडीने ही पोस्टर्स काढत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. या पोस्टर्सवर तिबेटी धर्मगुरु 'दलाई लामा' यांच्या नावाचा उपरोधिकपणे वापर करत मोदींना ' द लाय लामा' असे संबोधण्यात आले होते. दिल्लीतील मंदिर मार्ग जे-ब्लॉक परिसरातील उड्डाणपुल आणि रस्त्यांवरील भिंतींवर ही पोस्टर्स लावण्यात आली होती. मात्र, ही पोस्टर्स कोणी लावली, याबद्दल अद्यापपर्यंत माहिती मिळू शकलेली नाही. स्थानिकांच्या अंदाजानुसार आदल्या रात्री लावली असावीत. याशिवाय, मध्य दिल्लीतील पटेल नगर व शंकर रोड परिसरातही अशाचप्रकारची पोस्टर्स लावण्यात आली होती. मात्र, तिथेही पोलिसांनी तात्काळ धाव घेत ही पोस्टर्स काढून टाकली. पोलिसांनी अज्ञातांविरोधात सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
मोदींना 'The Lie Lama' म्हणणाऱ्या पोस्टर्समुळे दिल्लीत माजली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 20:33 IST