एस.पी.सिन्हा
पाटणा : बिहारचे माजी मंत्री राष्ट्रीय जनता दलाचे आमदार तेज प्रताप यादव यांची एका महिलेबरोबर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, वडील लालू प्रसाद यादव यांनी त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. सोशल मीडियावर पोस्ट करून लालू यांनी ही माहिती दिली.
लालू यादव यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘खासगी आयुष्यात नैतिक मूल्यांचा भंग करणे, आपल्या सामाजिक न्यायासाठीच्या सामूहिक संघर्षाला कमजोर करते. माझ्या मोठ्या मुलाचे वर्तन, सार्वजनिक आचरण आणि बेजबाबदारपणा हे आमच्या कौटुंबिक मूल्यांशी आणि संस्कारांशी सुसंगत नाही. ही परिस्थिती लक्षात घेता, मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून वेगळे करतो. आतापासून त्याची पक्षात आणि कुटुंबात कोणतीही भूमिका राहणार नाही. त्याला पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे.’
आपल्या खासगी जीवनात काय चांगले, काय वाईट, हे ठरविण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्यांनी विवेकाने निर्णय घ्यावा. मी सार्वजनिक जीवनात सामाजिक प्रतिष्ठेचा नेहमीच समर्थक राहिलो. कुटुंबातील सदस्यांनी सार्वजनिक जीवनात याच विचारांचे पालन केले आहे, असेही लालू यांनी म्हटले आहे.
तेजस्वी यादव म्हणाले, आम्ही अशा गोष्टी सहन करू शकत नाही. राहिला प्रश्न माझ्या मोठ्या भावाचा, तर राजकीय व खासगी आयुष्य हे वेगवेगळे असतात. त्यांना त्यांच्या खासगी आयुष्यात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ते प्रौढ आहेत आणि स्वतःचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत.