नबिन सिन्हा, नवी दिल्लीलोकसभा निवडणुकीत न भूतो अशा पराभवाची मीमांसा करण्यासाठी काँग्रेसने नेमलेल्या ए.के. अॅन्थनी समितीने आपले काम सुरू केले आहे. येत्या २८ जूनला या समितीने महाराष्ट्रातील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील १६ अन्य नेत्यांना चर्चेसाठी पाचारण केले आहे़ या समितीत पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विविध राज्यांमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षांचे नेते, प्रदेशाध्यक्ष व त्या-त्या राज्यांचे प्रभारी सरचिटणीस यांचा समावेश आहे.महाराष्ट्रात नेतृत्वबदलाची चर्चा आणि चव्हाण यांना अॅन्थनी समितीने चर्चेसाठी केलेले पाचारण हे सर्व २८ जूनपर्यंत तरी त्यांची खुर्ची शाबूत असल्याचे संकेत देणारे आहे़ गेल्या दोन दिवसांच्या वेगवान राजकीय घडामोडी आणि काल शनिवारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी त्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री चव्हाण यांची उचलबांगडी अटळ असल्याची चर्चा रंगली होती़ मात्र तूर्तास तरी चव्हाण यांच्या खुर्चीला धोका नसल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते़ एका अर्थाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे़ अॅन्थनी समितीची २८ जूनची बैठक होईपर्यंत राज्यातील नेतृत्वबदलाचा निर्णय लांबणीवर टाकला आहे़ अॅन्थनी समितीसमक्ष लोकसभेतील पक्षाच्या पराभवामागच्या सबबी तसेच भविष्याचा रोड मॅप यासोबतच महाराष्ट्रात काँग्रेसला नवसंजीवनी देऊ शकतील अशा नावांवर चर्चा अपेक्षित आहे़
दिल्लीत राज्यातील पराभवाची शनिवारी होणार मीमांसा
By admin | Updated: June 23, 2014 03:28 IST