जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या पोशाखात आलेल्या आत्मघाती दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे एका पोलीस स्टेशनवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन पोलीस शहीद झाले, तर एका पोलीस उपअधीक्षकासह ११ जण जखमी झाले. पोलिसांनीही दुपारपर्यंत चाललेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. गेल्या १ मार्च रोजी राज्यात पीडीपी-भाजप युती सरकारने सत्तासूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार दोन आत्मघाती दहशतवादी राजबाग पोलीस ठाण्यात घुसले आणि तुफान गोळीबार सुरू केला. यापूर्वी पोलिसांनी दोन दहशतवाद्यांसह एकूण सहा जण ठार झाले असल्याचे म्हटले होते. मृत दहशतवाद्यांजवळून काही महत्त्वाचे दस्तावेज आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेले सीआरपीएफचे जवान भरत प्रभू यांनी सांगितले की, लष्करी वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी जम्मूहून पठाणकोटला जाणाऱ्या एका जीपला चौकशीच्या कारणावरून थांबविले. त्यानंतर ती जीप ताब्यात घेऊन थेट राजबाग पोलीस स्टेशनला पोहोचले आणि सुरक्षेत तैनात जवानाला गोळ्या घालून ठार केले. पोलीस ठाण्यावर ग्रेनेड फेकून अंदाधुंद गोळीबार केला. पोलीस ठाण्यातील दृश्य एखाद्या रणांगणाप्रमाणे झाले होते. हल्ल्याचे वृत्त कळताच तातडीने अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी पाठविण्यात येऊन जम्मू-पठाणकोट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. (वृत्तसंस्था)जम्मू-काश्मीर विधानसभेतही या हल्ल्याचे पडसाद उमटले. विरोधकांनी या घटनेबाबत सरकारला उत्तर मागितले. नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य देवेंद्रसिंग राणा यांनी हा मुद्दा उपस्थित करून असे हल्ले रोखण्यासाठी सरकारने कुठली उपाययोजना केली आहे? असा सवाल केला. माकपचे एम.वाय. तारीगामी यांनी हल्ल्याची निंदा करून अशा प्रसंगांना आपण एकजूट असले पाहिजे, असे मत मांडले. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सुद्धा हल्ल्याचा निषेध केला. असे हल्ले यापूर्वीही झाले असून या मार्गाचाही त्यांनी वारंवार वापर केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने भूतकाळात झालेल्या अशा हल्ल्यांमधून धडा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कठुआ आणि सांबा जिल्ह्यात २०१३ आणि २०१४ मध्ये पोलीस ठाणी आणि लष्करी शिबिरांवर अशाप्रकारचे हल्ले झाले होते. राष्ट्रपतींनी केली निंदा; सतर्क राहण्याचे आवाहनराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जम्मूतील दहशतवादी हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली. सुरक्षा दलांना देशाची शांतता आणि सुरक्षेला असलेल्या कुठल्याही धोक्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन राष्ट्रपती मुखर्जी यांनी केले आहे. संसदेत चर्चा; सरकारची कोंडीठाण्यावरील दहशतवादी हल्ल्याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर गृहमंत्री राजनाथसिंग यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली.लोकसभेत काँग्रेसने या हल्ल्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करून मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांचे धोरण तर याला कारणीभूत नाही ना, असा सवाल केला. हल्लेखोर आत्मघाती दहशतवाद्यांना यमसदनी धाडणारे जम्मू-काश्मीरचे पोलीस आणि जवानांच्या पराक्रमाची गृहमंत्री सिंग यांनी प्रशंसा केली. सोबतच शहीद जवानांच्या कुटुंबियांचे सांत्वनही केले. राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या हल्ल्याची माहिती दिली. यावर संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी या हल्ल्याबाबत सरकारला संपूर्ण माहिती असून आपण गृहमंत्र्यांसोबत चर्चा केली असल्याचे स्पष्ट केले. सुरक्षा दलाची कारवाई अजूनही सुरू असल्याने तूर्तास गृहमंत्र्यांनी निवेदन देणे योग्य नाही,असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
पोलीस स्टेशनवर अतिरेकी हल्ला, ३ शहीद
By admin | Updated: March 21, 2015 00:01 IST