रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयोत्सवा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीचा तपास अहवाल आला आहे. सिद्धरामय्या सरकारने कर्नाटक उच्च न्यायालयात आपला अहवाल सादर केला आहे. अहवालात म्हटले आहे की, आरसीबीने पोलिसांच्या परवानगीशिवाय लोकांना विजय परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते.
विजयोत्सवामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ५० हून अधिक लोक जखमी झाले. राज्य सरकारने न्यायालयाला अहवाल गुप्त ठेवण्याची विनंती केली होती, पण न्यायालयाने म्हटले आहे की, या गोपनीयतेला कोणताही कायदेशीर आधार नाही.
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
आरसीबीने पोलिसांची परवानगी घेतली नव्हती
राज्य सरकारने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, आयपीएलचा अंतिम सामना जिंकल्यानंतर आरसीबी व्यवस्थापनाने ३ जून रोजी पोलिसांशी संपर्क साधला होता. पण, ही फक्त एक माहिती होती. व्यवस्थापनाने कायदेशीर परवानगी घेतली नव्हती. कायद्यानुसार, अशी परवानगी कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी घ्यावी लागते.
अहवालात आरसीबीच्या पोस्टचा उल्लेख
पोलिसांशी सल्लामसलत न करता, आरसीबीने दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०१ वाजता त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक फोटो पोस्ट केला. यामध्ये लोकांना मोफत प्रवेशाची माहिती देण्यात आली. लोकांना विधान सौधा येथून सुरू होणाऱ्या आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर संपणाऱ्या विजय परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.
त्यानंतर सकाळी ८ वाजता आणखी एक पोस्ट आली, यामध्ये माहितीचा पुनरुच्चार करण्यात आला. "त्यानंतर, ०४.०६.२०२५ रोजी सकाळी ८:५५ वाजता, आरसीबीने त्यांच्या अधिकृत हँडल @Rcbtweets वर एक्स वर आरसीबी संघाचा एक प्रमुख खेळाडू विराट कोहलीची एक व्हिडीओ क्लिप शेअर केली. यामध्ये त्याने नमूद केले की, संघ ०४.०६.२०२५ रोजी बंगळुरू शहरातील लोकांसह आणि बंगळुरूमधील आरसीबी चाहत्यांसह हा विजय साजरा करू इच्छित आहे," असे अहवालात म्हटले आहे.
यानंतर, आरसीबीने ०४.०६.२०२४ रोजी दुपारी ३:१४ वाजता आणखी एक पोस्ट केली. यामध्ये विधान सौधा ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत सायंकाळी ५:०० ते ६:०० वाजेपर्यंत विजय परेड आयोजित करण्याची घोषणा केली.
३ जून रोजी, आरसीबीने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्जचा पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद जिंकले.