नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 11,300 कोटींच्या घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी याचे सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना भाजपाकडून शनिवारी पहिल्यांदाच जाहीरपणे प्रत्युत्तर देण्यात आले. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवरील सर्व आरोपांचे खंडन केले. उलट त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांचेच एकमेकांशी कशाप्रकारचे साटेलोटे आहे, याकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, नीरव मोदी याच्या गीतांजली जेम्सला 2013 मध्ये राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहार करण्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. मात्र, तरीही त्यावेळी राहुल गांधी यांनी गीतांजली जेम्सच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तर नीरव मोदीच्या फायर स्टार डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशीही काँग्रेस नेत्यांचा संबंध आहे. नीरव मोदीने अद्वैत होल्डिंग्सकडून मुंबईतील मालमत्ता लीझ करारावर घेतली होती. त्यावेळी काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांची पत्नी अनिता सिंघवी या कंपनीच्या समभागधारक होत्या. त्यामुळे काँग्रेसने त्यावेळी हा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप निर्मला सीतारामन यांनी केला. निर्मला सितारामन यांच्या आरोपांनंतर अभिषेक सिंघवी यांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांचे खंडन केले. माझ्या पत्नीचा किंवा मुलाचा नीरव मोदी यांच्या कंपनीशी कोणताही संबंध नाही. भाजपा खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवत आहे. त्यामुळे मी निर्मला सितारामन आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानाची खटला दाखल करण्याच्या विचार करत आहे, असे अभिषेक सिंघवी यांनी सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनीही भाजपावर पीएनबी घोटाळ्यावरून पुन्हा एकदा टीका केली. आमच्या देशाचे चौकीदार इतरांना भजी तळण्याचे सल्ले देतात. हा चौकीदार झोपल्यामुळेच चोर पळून गेला. पंतप्रधान आपल्या परदेशातील दौऱ्यातील सहकाऱ्यांची नावे जाहीर करत नाहीत. पंतप्रधानांना ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणून हेच अपेक्षित आहे का, असा सवाल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला.
PNB fraud: नीरव मोदीच्या कार्यक्रमात राहुल गांधींनी लावली होती हजेरी; भाजपाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 18:10 IST