PM Modi on GST 2.0 : केंद्र सरकारने GST सुधारणा केल्यानंतर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना याबद्दल शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, उद्या(२२ सप्टेंबर ) पासून जीएसटी बचत महोत्सव सुरू होतोय. या बचत महोत्सवामुळे देशातील प्रत्येक नागरिकाची बचत होईल, प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण असेल. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. कराचे जाळे त्रासदायक होते, परंतु आता जीएसटी सुधारणांमुळे सर्वकाही सोपे होणार आहे.
जीएसटी सुधारणा
२२ सप्टेंबर २०२५ पासून जीएसटी सुधारणा लागू होणार आहेत. यानुसार १२-२८% चे कर स्लॅब संपवले जातील आणि फक्त ५-१८% चे स्लॅब राहतील. पीएम मोदींनी या सुधारणांचे फायदे सांगताना म्हटले की, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ९९ टक्के वस्तू ५% स्लॅबमध्ये येतील. म्हणजेच, देशातील नागरिकांना या वस्तू अतिशय स्वस्त दरात मिळतील. यामुळे तुमची बचत वाढेल आणि तुम्हाला तुमच्या पसंतीच्या वस्तू सहज खरेदी करता येतील. या सुधारणा देशातील गरीब, मध्यमवर्गीय, तरुण, शेतकरी आणि महिलांना मोठा फायदा देतील.
नेक्स्ट जेनरेशन जीएसटीचा लाभ
नेक्स्ट जेनरेशन जीएसटी सुधारणा देशातील गरीब-मध्यमवर्गीय, तरुण, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी व उद्योजक सर्वांनाच मोठा फायदा देतील. सणांच्या हंगामात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद खुलेल. या बदलांमुळे प्रत्येक कुटुंबातील आनंद वाढेल. हे बदल भारताला नवीन गती देणारे आहेत. हे बदल लोकांना आवश्यक वस्तू खरेदी करताना सवलत देतील, व्यवसाय सुलभ करतील आणि गुंतवणूक आकर्षक बनवतील. तसेच, प्रत्येक राज्याला विकासाच्या स्पर्धेत समान संधी देतील. सुधारणा ही सततची प्रक्रिया आहे. काळ आणि गरजा बदलत असतात. त्यामुळे देशाच्या वर्तमान आणि भविष्याच्या गरजा पाहता नेक्स्ट जेनरेशन जीएसटी सुधारणा लागू केल्या जात आहेत, असेही त्यांनी म्हटले.