नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेसह सुमारे २० नागरी सेवांच्या हजारो अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कन्फेडरेशन आॅफ सिव्हिल सर्व्हिसेस असोसिएशन (सीओएससीए) सातव्या केंद्रीय वेतन आयोगाकडे धाव घेत ‘श्रेणीविषयक पूर्वग्रहाबाबत’ तक्रार केली असून त्यांना आयएएस अधिकाऱ्यांपेक्षा कमी लेखण्याचे प्रयत्न सोडून नोकरीत समानता आणण्याची मागणी केली आहे.आयएएस अधिकाऱ्यांना ते श्रेष्ठ असल्याचे भासवून अन्य नागरी सेवांच्या सदस्यांना ‘कमी लेखण्याचे’ प्रयत्न अतिशय दुर्दैवी असल्याचे सीओएससीएने आपल्या याचिकेत म्हटले आहे. आयएएस अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सेवालाभासंदर्भात आयएएस अधिकारी आणि केंद्र सरकारच्या अन्य सेवा अधिकाऱ्यांमध्ये वाक्युद्ध सुरू असताना नेमक्या याचक्षणी सीओएससीएने संबंधित याचिका दाखल केली आहे.आयएएस अधिकाऱ्यांचे महत्त्व कुणीही अमान्य करीत नाही. सरकारमध्ये त्यांची भूमिका निश्चितपणे महत्त्वपूर्ण आहे. मात्र म्हणून आयएएस अधिकाऱ्यांना श्रेष्ठ भासवून अन्य सेवांच्या अधिकाऱ्यांना कमी लेखणे, त्यांचे योगदान तुच्छ लेखणे, त्यांच्याविरुद्ध तिरस्काराची भाषा करणे हे स्वीकार्य नाही. याची निंदा व्हायला हवी. हा प्रकार ‘श्रेणीविषयक पूर्वग्रह’ दाखवणारा आहे. देशात याला काहीही स्थान नाही. कारण सर्व सेवा समान आहेत. आपले युवा आयएएस सहकारी ज्या दिशेने विचार करतात, तो २१ व्या शतकातील भारताच्या मुख्यधारेतील विचारांच्या विपरीत आहे, असे सीओएससीएने आपल्या याचिकेत म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘आयएएस श्रेष्ठते’विरुद्ध याचिका
By admin | Updated: November 9, 2015 23:12 IST