नवी दिल्ली - पिझ्झा खायला सर्वांनाच खूप आवडतं. अनेकदा छोट्या-मोठ्या पार्टीसाठी हमखास पिझ्झा ऑर्डर केला जातो. अशातच एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे जो पाहिल्यावर पिझ्झाप्रेमींना मोठा धक्का बसेल. हॉटेल, रेस्टॉरंटच्या ठिकाणी काहीवेळा अस्वच्छता किंवा निष्काळजीपणा केल्याच्या घटना या समोर येत आहेत. याच दरम्यान डॉमिनोजच्या किचनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पिझ्झा डोव्हच्या ट्रेवर चक्क टॉयलेट स्वच्छ करण्याचे ब्रश लटकवून ठेवलेले फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत. साहिल कारनानी या ट्विटर युजरने हा फोटो शेअर केला आहे. एका ट्रेमध्ये पिझ्झासाठी लागणारे डोव्ह ठेवण्यात आले आहेत आणि त्याच्याच वर टॉयलेट स्वच्छ करण्याचे ब्रश ठेवलेले दिसत आहेत. "अशा पद्धतीने डॉमिनोज आपल्याला फ्रेश पिझ्झा पुरवतो, अत्यंत खराब" असं कॅप्शन युजरने दिले आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट करून संताप व्यक्त केला.
डॉमिनोजच्या बंगळुरू येथील स्टोरमधील हा फोटो असल्याचं समोर आलं आहे. हा फोटो तुफान व्हायरल झाल्यानंतर डॉमिनोजने या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही स्वच्छता आणि स्वच्छतेची चांगली काळजी घेतो. आम्ही त्या स्टोरवर कडक कारवाई केली आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.