Dog Kills Snake : प्राण्यांमध्ये कुत्रा हा मानवांप्रती सर्वात निष्ठावान मानला जातो. कुत्र्याच्या निष्ठेची अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली-पाहिली असतील. कुत्र्याने एखाद्या व्यक्तीला जीव लावला, तर तो शेवटपर्यंत त्याच्याशी प्रामाणिक राहतो. कुत्र्याच्या निष्ठेचे असेच एक उदाहरण कर्नाटकातील हसनमधून समोर आले आहे. येथे दोन पाळीव कुत्र्यांनी धाडसाने आपल्या मालकाच्या मुलांना विषारी सापापासून वाचवले. या दरम्यान एका कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला.
सापाचे तुकडे केले, पण...मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कर्नाटकातील हसन तालुक्यातील कट्टया गावची आहे. घरातील लहान मुले अंगणात खेळत होती, यावेळी रॅटलस्नेक घरात शिरला. सापाला पाहताच पिटबुल आणि डॉबरमॅनने त्याच्यावर हल्ला केला. या दोन्ही कुत्र्यांनी सापाचा चावा घेत त्याचे दहा तुकडे केले. पण, यादरम्यान पिटबुल कुत्र्याच्या चेहऱ्याला साप चावला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
पिटबुलच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, या पिटबुलने अनेक डॉग शोमध्ये पुरस्कारही जिंकले आहेत. ही घटना कुत्र्यांच्या निष्ठेचे जिवंत उदाहरण आहे. सध्या गावात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, कुत्र्याच्या शौर्याचे कौतुक करत आहेत.