मुंबई : लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची सोबत करणा-या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे पक्षाध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे यांना पाठवून दिले. मुंबई प्रदेशाध्यक्ष बदलावा, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी राजीनामास्त्र उगारले आहे. पक्षाची विस्कळीत घडी बसविण्यासाठी तसे मुंबई कार्यकारिणी पुनर्स्थापित करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. अकार्यक्षम मुंबई अध्यक्षांना बदलण्याची मागणीही करण्यात आली. गेल्या ११ वर्षांपासून मिलिंद सुर्वे मुंबई अध्यक्षपदावर आहेत. या प्रदीर्घ कार्यकाळात सरचिटणीस अथवा अन्य कार्यकारिणी स्थापन करण्याचेही कष्ट सुर्वेंनी घेतले नाहीत. मुंबईतील २२७ वॉर्डांत कार्यकारिणी, ३४ तालुके व ६ जिल्ह्यांपैकी ३ ठिकाणी अध्यक्षही नेमण्यात आले नाहीत. केवळ ठरावीक वॉर्डात, तालुक्यात नेमणुका झाल्या असून मुंबईत पक्षविस्तार करण्यास विद्यमान अध्यक्षांना अपयश आले असून, त्यांना तातडीने हटविण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. १५ सप्टेंबर रोजी मुंबईसह राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षाला चुकीचा संदेश मिळू नये, अशी मागणी कवाडे, युथ फोर्सचे प्रमुख जयदीप कवाडे, प्रदेशाध्यक्ष गोपाळराव आटोटे यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)
पीपल्सच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे
By admin | Updated: September 22, 2014 04:37 IST