ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली दि. ३ - आकाशवाणीद्वारे देशातील करोडो नागरिकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आपली ताकद ओळखण्याचे आवाहन केले. 'मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे त्यांनी जनतेशी अनेक विषयांवर संवाद साधला. सिंह व लांडग्याची गोष्ट सांगत प्रत्येकाने आपला आत्मसन्मान व आत्मबळ ओळखावे असा सल्ला त्यांनी दिला.
देशातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी त्यांना दस-याच्या मुहुर्तावर स्वच्छतेचा संकल्प करण्याचे तसेच आपल्यामधील दहा अवगुणांचा नायनाट करण्याची शपथ घ्यावी अशी इच्छाही व्यक्त केली. यावेळी त्यांनी नागरिकांना स्वदेशी वापरण्याचा सल्ला दिला. जास्तीत जास्त खादीची वस्त्रे वापरल्यास देशातील गरीबांना त्याचा फायदा होईल आणि देशाचा विकास होईल असे ते म्हणाले. जनतेने आपल्याला पाठवलेल्या ई-मेल मधील काही निवडक मेलचा उल्लेख करत त्यातील सल्ले लक्ष वेधून घेणारे असल्याचे सांगत त्यावर नक्की काम करण्यात येईल असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला.
देशातील शेतकरी, स्त्रिया आणि युवकांमध्ये खरी शक्ती आहे आणि सर्व समस्यांवर मात करण्याची ताकद या त्रिशुळामध्ये आहे असल्याचेही त्यांनी सांगितले. रेडियोच्या माध्यमातून देशाच्या कानाकोप-यातील सर्व नागरिकांशी, गरीबांशीही जोडले जाता येऊ शकते असे सांगत दर रविवारी सकाळी अकरा वाजता रेडिओवरुन आपण देशवासीयांशी संवाद साधणार आहोत असे त्यांनी जाहीर केले.