पाटणा: काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या ‘मतदार अधिकार यात्रेदरम्यान बिहारमध्ये माझ्या आईबद्दल अपशब्द वापरण्यात आले. या घटनेमुळे मला अत्यंत वेदना झाल्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यथित मनाने मंगळवारी सांगितले. ते म्हणाले की, मी एकवेळ राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेसला क्षमा करेनही; पण बिहारची जनता माझ्या आईचा अपमान करणाऱ्यांना माफ करणार नाही.
दरभंगामध्ये त्यांच्या दिवंगत आईबद्दल अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या वादंगावर मोदी म्हणाले की, माझ्या आईचा अवमान केलेल्या लोकांनी याआधी अनेकदा भारतमातेचा अपमान केला आहे. त्याची शिक्षा त्यांना नक्की मिळणार आहे. माझ्या आईला राजकारणाशी काही देणेघेणे नव्हते. मग तिच्याबद्दल अपशब्द का वापरण्यात आले? असा सवालही त्यांनी विचारला. बिहारमधील महिलांसाठी नव्या सहकारी संस्थेचे पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले. (वृत्तसंस्था)
हा तर माताभगिनींचा अपमान
पंतप्रधान म्हणाले की, बिहारमध्ये माझ्या आईला राजद, काँग्रेसच्या व्यासपीठावरून अपशब्द वापरण्यात आले. असे काही होईल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. हा प्रकार बिहारमधील माताभगिनींचा अपमान आहे. अशी कृत्ये हे लोक कधीच माफ करणार नाहीत. माझ्या आईनेच मला मातृभूमीची सेवा करण्यास सांगितले आहे.
स्त्रियांच्या शोषणाची मानसिकता
मोदी म्हणाले की, माझ्या आईने स्वतःसाठी कधीही उत्तम साडीही खरेदी केली नाही. आईचे स्थान देवापेक्षा मोठे आहे. जे लोक माताभगिनींसाठी अपशब्द वापरतात, स्त्रियांना दुर्बल समजतात, त्यांची मानसिकता ही स्त्रियांचे शोषण करण्याची असते. जेव्हा असे महिला-विरोधी विचारसरणीचे लोक सत्तेवर येतात, तेव्हा सगळ्यात जास्त त्रास माताभगिनींना सहन करावा लागतो. राजदच्या ‘माफिया राज’मध्ये नेमके हेच घडले होते, असेही मोदी यांनी सांगितले.