श्रीकांत ऱ्हायकर- धामोड , तुळशी-धामणी परिसरातील ३८ गावांसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, धामोडची व्यवस्था ‘रामभरोसे’ झाली असून, येथे उपचारांसाठी येणाऱ्या गरीब व गरजू लोकांच्या सेवेसाठी येथे ‘ना वैद्यकीय अधिकारी हजर आहेत, ना कर्मचारी’. काल, शनिवारी या आरोग्य केंद्राला पंचायत समिती राधानगरीचे सदस्य जयसिंग खतकर यांनी भेट दिली असता या आरोग्य केंद्रात सायंकाळी चार वाजता फक्त एकच शिपाई हजर असल्याचे जाणवले. दरम्यान, उपस्थित रुग्णांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करीत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून ओपीडी पेशंट तपासत असताना दहा रुपयांची मागणी होत असून, मोबदल्यात आम्हाला कोणत्याच सेवा पुरविल्या जात नाहीत, असे सांगून आरोग्य केंद्राच्या समस्यांचा पंचनामाच काल रुग्णांनी केला. अंत्यत डोंगराळ व दुर्गम अशा परिसरात असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र धामोड येथील गरीब लोकांसाठी एक नवसंजीवनी आहे. पण, येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात कोणताच समन्वय नसल्याने कामाच्या वाटणीवरून या आरोग्य केंद्रात सातत्याने वाद होतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल पंचायत समिती सदस्य जयसिंग खामकर यांनी आरोग्य केंद्रास भेट दिली असता येथे एक शिपाई व पडसाळी उपकेंद्राच्या आरोग्य सेविका येथे असल्याचे दिसले. आरोग्य केंद्रातील हजेरी पत्रक तपासले असता त्यामध्ये अनेक चुका असल्याचे निदर्शनास आले. काही कर्मचाऱ्यांनी आठ ते दहा दिवसांच्या सह्याच न केल्याचेही दिसून आले. या सर्व प्रकारांवरून त्यांनी बाह्यरुग्ण विभागाचेही कामकाज पाहिले असता त्या रजिस्टरमध्येही त्रुटी जाणवल्या. दरम्यान, उपस्थित रुग्णांनी आरोग्य केंद्रातील असुविधांचा पाढा वाचून आरोग्य केंद्राचा पंचनामा केला. यावेळी कोतोली, राधानगरी, कळे, धामोड येथील रुग्णांना उपचारांअभावी रिकाम्या हातांनी घरी परतावे लागले. दोन दिवसांपूर्वी तर बाळंतपणासाठी आलेल्या एका महिलेच्या जिवाशी खेळ मांडत निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित आरोग्य सेवेचा अंतच केला. त्या संबंधित महिलेची डिलिव्हरी लाईट नसताना केली व तिच्या आईला घरातून केरोसीनचा दिवा घेऊन येण्यास सांगितले. या सर्व प्रकारांमुळे हा दवाखाना रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार की, रुग्णांचा जीव घेणारा आहे. याबद्दल तीव्र प्रतिक्रिया महिलांनी बोलून दाखविल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड
By admin | Updated: July 27, 2014 23:07 IST