दिल्ली विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती. एक प्रवासी मगरीचे शिर घेऊन आला होता. अधिकारी ते कापलेले शिर पाहून हैराण झाले होते. हा प्रवासी भारताचा नाही तर कॅनडाचा होता. त्याला विमानात प्रवेश दिलाच कसा असा प्रश्न दिल्ली विमानतळ प्रशासनाला पडला होता. त्यात तो दिल्लीत उतरल्याने सर्वांची धावपळ उडाली आणि वनविभागालाच पाचारण करावे लागले.
अधिकाऱ्याने एका बॉक्समध्ये काहीतरी विचित्र वस्तू घेऊन जाताना एका प्रवाशाला पाहिले होते. त्याला इतर प्रवाशांपासून बाजुला करण्यात आले आणि बॉक्स दाखविण्यास सांगण्यात आले. त्याच्याकडे मगरीचे शिर होते. वनविभागाने केलेल्या तपासणीनंतर ते खरेखुरे असल्याचे समोर आले.
त्याने कोणत्याही मगरीला मारलेले नाही, असे पोलिसांना सांगितले. तसेच हे शिर थायलंडमध्ये खरेदी केल्याचेही सांगितले. थायलंडमध्ये मगरीचे मांस खाल्ले जाते. यामुळे तिथे हे सामान्य आहे. परंतू, भारतात मगर हा संरक्षित प्राणी असल्याने इथे प्रतिबंध आहे. हे त्या प्रवाशाला माहिती नव्हते. तो ते घेऊन भारतात का आला? कनेक्टेड फ्लाईट होती का याची माहिती समोर आलेली नाही.
भारतात वन्य जिवांचे अवशेष किंवा उत्पादनांसोबत प्रवास करण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते, ती त्याच्याकडे नव्हती. यामुळे वनविभागाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे शिर वनविभागाने जप्त केले आहे.