कोलकता : सिलीगुडी महकुमा परिषद आणि अन्य दोन नगरपालिकांसाठी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत किमान ७० टक्के मतदान झाले. यावेळी मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात किमान दोन जण ठार झाले. तृणमूल काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप माकपाने केला आहे.या गैरप्रकारांच्या विरोधात राजरहाट आणि बिधाननगर भागात माकपाने सोमवारी बंदचे आवाहन केले आहे. बिधाननगर आणि असनसोल येथे ७१ टक्के, तर सिलीगुडी येथे ६५ टक्के मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि प्रतिस्पर्धी माकप यांच्यात या निवडणुकीसाठी तीव्र स्पर्धा लागली आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीद्वारे तृणमूलसमोर माकपाचे तगडे आव्हान असून, माकपाचा हल्ला परतावून लावत सत्ता कायम राखावयाची आहे.या निवडणुकीशिवाय बांकुरा जिल्ह्यातील पंचायती व दोन पंचायत समितीसाठी निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतीच्या ३४ जागांसाठीही पोटनिवडणूक झाली. (वृत्तसंस्था)
प. बंगालमध्ये हिंसाचार
By admin | Updated: October 4, 2015 00:40 IST