मध्य प्रदेशातील पन्ना हे ठिकाण हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. विनिता गोंड या आदिवासी महिलेला एकाच दिवसात तीन मौल्यवान हिरे सापडले. यामुळे विनिता आता एका रात्रीत लखपती झाल्या आहेत. विनिता यांनी हिऱ्याच्या खाणीत आपलं नशीब आजमावलं आणि त्याचा परिणाम आश्चर्यकारक होता. तीन मौल्यवान हिरे सापडल्यामुळे आता त्यांचं आयुष्य बदललं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पन्नाच्या राजपूर (बरवारा) येथील रहिवासी विनिता यांनी हिरे कार्यालयाकडून खाणीसाठी भाडेपट्टा मिळवला. याच दरम्यान त्यांचं नशीब चमकलं. जेव्हा त्यांना हे तीन हिरे सापडले तेव्हा आनंदाला सीमाच नव्हती. विनिता यांनी लगेच सापडलेले हिरे पन्ना हिऱ्याच्या कार्यालयात जमा केले.
हिरे तज्ज्ञ अनुपम सिंह यांनी या हिऱ्यांबद्दल सविस्तर माहिती दिली, त्यांनी सांगितलं की, हिऱ्यांचं एकूण वजन अनुक्रमे ७ सेंट, १ कॅरेट (४८ सेंट) आणि २० सेंट आहे. या तीन हिऱ्यांपैकी एक रत्नजडित दर्जाचा आहे, जो खूप उच्च दर्जाचा मानला जातो.
हे हिरे आता लिलावासाठी ठेवण्यात येतील, जिथे त्यांची खरी किंमत उघड होईल. विनिता गोंड यांची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे. याआधी देखील अनेकांना हिरा सापडला, ज्यामुळे त्यांचं नशीब पालटलं आहे.