मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील कटिया या छोट्याशा गावातील एका मजूर दाम्पत्याचं नशीब फळफळलं आहे. पाच वर्षे खाणीत घाम गाळणाऱ्या हरगोविंद यादव आणि त्यांची पत्नी पवन देवी यादव यांना कष्टाचं फळ अखेर मिळालं. खाणीत काम करत असतानाच त्यांना आठ मौल्यवान हिरे सापडले. या हिऱ्यांची अंदाजे किंमत १० ते १२ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामुळे हे गरीब दाम्पत्य आता एका रात्रीत करोडपती झालं.
हरगोविंद आणि पवन देवी गेल्या पाच वर्षांपासून हिऱ्यांच्या खाणीत मजूर म्हणून काम करत होते. दिवसरात्र ते कष्ट करत होते. कठोर परिश्रम केल्याच्या अनेक खुणा त्यांच्या हातांवर अजूनही आहेत, परंतु आता याच हातांनी त्यांना त्यांचं जीवन बदलणारा खजिना सापडला आहे. खाणीत काम करताना त्यांना एकाच वेळी आठ हिरे सापडले. याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
यादव कुटुंबाला खाणीतून खजिना सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही वर्षांपूर्वी हरगोविंदच्या धाकट्या भावालाही सुमारे १.५ लाख रुपये किमतीचा हिरा सापडला. परंतु माहितीअभावी तो हिरा फक्त १ लाख रुपयांना विकला गेला. यावेळी या दाम्पत्याने घाई केली नाही. त्यांनी त्यांचे हिरे पन्ना येथील डायमंड संग्रहालयात जमा केले, जिथे तज्ज्ञ त्यांची शुद्धता आणि किंमत सांगतील.
आता या आठ हिऱ्यांचा सरकारी प्रक्रियेअंतर्गत लिलाव केला जाईल. हिरा जमा केल्यानंतर ज्वेलर्स त्यांचं मूल्यांकन करतील आणि ते लिलावात विकले जातील. लिलावाच्या रकमेतून १२.५ टक्के रॉयल्टी वजा केल्यानंतर, उर्वरित रक्कम हरगोविंद आणि पवन देवी यांना दिली जाईल. ही रक्कम त्यांचं आयुष्य बदलणार आहे. या घटनेची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.