ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - मुंबईतील साखळी बाँबस्फोटातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानमध्येच असल्याचा दावा एका संकेतस्थळाने केला आहे. दाऊद आणि त्याचा दुबईतील साथीदार या दोघांमधील मोबाईल फोनवरील संभाषण एका संकेतस्थळाने जाहीर केला असून यावरुन दाऊद कराचीमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एका संकेतस्थळाने गेल्या महिन्यात दाऊद आणि त्याच्या दुबईतील साथीदारासोबतचे संभाषण रेकॉर्ड केले असून हे संभाषण शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आले आहे. पाश्चिमात्त्य एजंसीने सॅटेलाईटच्या माध्यमातून दाऊदचे संभाषण रेकॉर्ड केले असून वेबसाईटच्या संपादकांनी पुरावा म्हणून संभाषणाची क्लिपही जाहीर केली आहे. पहिल्यांदाच दाऊदचा आवाज रेकॉर्ड झाल्याचा दावाही या संकेतस्थळाच्या संपादकांनी केला आहे. संभाषणामध्ये दाऊद दुबईतील बांधकाम प्रकल्पाची चर्चा करत आहे. दाऊद स्वतःला पंतप्रधानापेक्षा कमी समजत नसून तो अजूनही ऐशोआरामत जीवन जगत असल्याचे या संभाषणात ऐकायला मिळते. मी कोणत्याही न्यायालयाला मानत नसून मी स्वतःच एक न्यायालय आहे असे मुजोर वक्तव्यही दाऊदने या संभाषणात केले आहे. पाक सरकारने वारंवार दाऊद पाकमध्ये नसल्याचे म्हटले होते. मात्र ही ऑडिओ क्लिप खरी असेल तर पाकचे पितळ उघडे पडेल असे दिसते.